अकरावी प्रवेशाची दुसरी यादी आज

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत अकरावी प्रवेशासाठीची नियमित फेरी २ नुसार ‘दुसरी प्रवेश यादी’ बुधवार, १० जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील २ लाख ४९ हजार ५० जागांसाठी २ लाख २८ हजार ३१२ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी १ लाख ३० हजार ६५० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आणि या यादीअंतर्गतचे ९७ हजार ६६२ विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

विद्यार्थ्यांना स्वत:च्या लॉगिनमध्ये जाऊन ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करून कोणते महाविद्यालय मिळाले, हे पाहता येईल. जर विद्यार्थ्याला मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा नसल्यास तो पुढील फेरीसाठी थांबू शकतो. मात्र, विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. तसेच, मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय प्रवेशाच्या २ लाख ५१ हजार २४२ जागांवर आतापर्यंत ५७ हजार ४५० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर १ लाख ९३ हजार ७९२ जागा रिक्त आहेत. कोटांतर्गत उपलब्ध असणाऱ्या १ लाख ४८ हजार ६४३ जागांवर १९ हजार १२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत आणि १ लाख २९ हजार ५१६ जागा रिक्त आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोटांतर्गत मिळून उपलब्ध असणाऱ्या ३ लाख ९९ हजार ८८५ जागांवर ७६ हजार ५७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर ३ लाख २३ हजार ३०८ जागा रिक्त आहेत.

हेही वाचा…मुंबईत झाडावर चढून चित्रपट निर्मात्याचं आंदोलन; मराठी चित्रपटसृष्टीचा उल्लेख करत केली ‘ही’ मागणी

दहावीचा निकाल वाढल्यामुळे यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी चढाओढ वाढली आहे. वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तसेच, वाढलेल्या निकालाचा परिणाम अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीपासून दिसू लागला आहे. पहिल्या प्रवेश यादीनुसार वाणिज्य अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) गेल्या वर्षीच्या तुलनेत २ ते ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, कला व विज्ञान शाखेचे प्रवेश पात्रता गुणही नव्वदीपार गेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या प्रवेश यादीनुसार प्रवेश पात्रता गुणांमध्ये कितपत घट किंवा वाढ होते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…Worli Hit And Run Case : तीन दिवस फरार असलेल्या मिहीर शाहला पोलिसांनी कसं पकडलं? वाचा अटकेचा घटनाक्रम!

कोटांतर्गत प्रवेशासाठी

संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गतच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश यादीही बुधवार, १० जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल, तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून दूरध्वनीवरून संपर्क साधला जाईल. या विद्यार्थ्यांना १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोटांतर्गत प्रवेश निश्चित करावे लागतील.

2024-07-10T04:53:34Z