युरोपीय महासंघाच्या निवडणुकीत फ्रान्समध्ये उजव्या शक्तींना बळ मिळाल्यानंतर संसदेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा जुगार अंशत: यशस्वी झाला आहे. उजव्या विचारांच्या ‘नॅशनल रॅली’ (आरएन) या पक्षाला सत्तेपासून रोखण्याचे त्यांचे उद्दिष्ट साध्य झाले असले, तरी त्यांचा मध्यममार्गी ‘एन्सेंबल अलायन्स’ दुसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. डाव्या पक्षांच्या ‘न्यू पॉप्युलर फ्रंट’ या आघाडीने सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या, तरी ती स्वबळावर सत्तेवर येऊ शकत नाही.
फ्रान्समध्ये संसदेसाठी दोन फेऱ्यांत मतदान होते. पहिल्या फेरीत ज्या मतदारसंघांत एकाही उमेदवाराला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते पडत नाहीत, तिथे दुसऱ्या फेरीसाठी मतदान होते. या वेळच्या पहिल्या फेरीच्या निवडणुकीत उजव्या ‘आरएन’ने ३३ टक्के मते मिळवून पहिले स्थान पटकावले होते. पहिल्या फेरीत ७६ जागांचे निकाल नक्की झाले होते. त्यामुळे उर्वरित सर्व जागांसाठी दुसऱ्या फेरीत मतदान झाले. पहिल्या फेरीतील कल कायम राहिल्यास मेरीन ली पेन यांचा ‘आरएन’ बहुमत मिळवेल, अशी शक्यता होती. मात्र, मॅक्रॉन यांनी डाव्या पक्षांशी हातमिळवणी केली. ‘आरएन’ला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी डाव्या आणि मध्यममार्गी या पक्षांनी आपापले कमकुवत उमेदवार मागे घेतले. यामुळे ४०९ जागांवर सरळ लढती झाल्या; त्यांत डाव्यांची आणि मध्यममार्गीयांची सरशी झाली. मॅक्रॉन यांच्या या रणनीतीमुळे फ्रान्समधील सत्तेचे उजवे वळण नक्कीच टळले. स्वातंत्र्य, समता, बंधुता हा मंत्र जपणाऱ्या फ्रान्समध्ये उजव्या शक्तीला वरचढ होऊ न देण्याचा ताजा कौल तेथील मतदारांमधील शहाणीव दाखवणारा आहे. मात्र, तो संदिग्ध असल्याने डावे आणि मध्यममार्गीयांना सत्तेसाठी एकत्र यावे लागणार आहे. उजव्यांच्या विरोधात ते एकत्र आले हे खरे; परंतु सत्ता राबविण्यासाठी तसे करतील का, हा प्रश्न आहे.
निवृत्तीच्या वयापासून संपत्ती करापर्यंत आणि निर्वासितांच्या धोरणांपासून अपारपंरिक ऊर्जावापरापर्यंत अनेक मुद्द्यांवर या दोहोंत कमालीचे मतभेद आहेत. ते बाजूला ठेऊन समान उद्दिष्ट ठरवून ते सत्ता राबवतील काय, हाही प्रश्न आहे. मध्यममार्गीयांसाठी तडजोडीची असमर्थता काही डाव्यांनी व्यक्त केली असून, अल्पमतातील सरकार स्थापण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत मॅक्रॉन काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. आणखी एक वर्ष त्यांना नव्याने निवडणूक घेता येणार नाही; त्यामुळे फ्रान्समध्ये सत्ताधाऱ्यांना आघाडी सरकार चालविण्याची कसरत करावी लागणार यात शंका नाही.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-07-10T07:04:01Z