पर्यावरणाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते-अभ्यासक मनोज मिश्रा यांच्या निधनामुळे यमुना नदीच्या शुद्धीसाठी लढणाऱ्या समर्पित जीवनाची अखेर झाली. रस्त्यावरील लढाई, जागृती आणि न्यायालयीन लढा अशा विविध मार्गांनी त्यांनी नद्यांच्या रक्षणासाठी कार्य केले आणि शेकडो कार्यकर्तेही घडविले. पंतनगर आणि अलाहाबाद विद्यापीठात शिक्षण घेतानाच त्यांना पर्यावरणाची गोडी लागली. पुढे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांनी वनखात्यात सेवा केली.
या काळात अनेक राष्ट्रीय अभयारण्यांचे संचालकपद भूषविताना जल-जंगल-जमीन आणि जैव विविधतेशी नाते अधिक दृढ झाले. त्यामुळे २२ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी पर्यावरण रक्षणास वाहून घेतले. यमुना नदीच्या क्षेत्राचा दौरा करून त्यांनी नदीस्थितीचा अभ्यास केला. नदीत येणारे सांडपाणी, त्यामुळे होणारे प्रदूषण, धरणांमुळे अडलेले प्रवाह आणि अवैध वाळू उपसा यांमुळे नदीवर विपरीत परिणाम झाल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर त्यांनी दिल्लीत यमुनेच्या संरक्षणासाठी सत्याग्रह केला, तसेच अनेक न्यायालयीन लढे दिले. मेट्रो-बस डेपोंमधील राडारोड्याची विल्हेवाट, पावसाळी नाले बुजविणे तसेच पर्यावरण मूल्यांकन न करता आखलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला. त्यावर न्यायालयांनी स्पष्ट आदेश दिल्यानंतरही ढिम्म राहिलेल्या नोकरशाहीकडून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना लढे द्यावे लागले.
‘वर्ल्ड कल्चर फेस्टिव्हल’च्या आयोजनामुळे नदीकाठाचे नुकसान झाल्याच्या मुद्द्यावर मिश्रा यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये केलेली याचिका देशभर चर्चेत आली. त्यापोटी आयोजक ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ला पाच कोटी रुपयांची भरपाई सरकारला देण्याचा हुकूम देण्यात आला. त्यांच्या याचिकेमुळे यमुना नदीरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार झाला.
दरवर्षी नदी सप्ताह भरवून मिश्रा यांनी सातत्याने जनजागृती केली. त्यातून पर्यावरणप्रेमी अनेक कार्यकर्तेही घडले आणि देशातील विविध नद्यांच्या रक्षणासाठी लढ्यांना प्रेरणा मिळाली. या समर्पित कार्यामुळे ‘यमुना मॅन’ म्हणून त्यांना संबोधण्यात येत असे. यमुनेसह विविध नद्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी सरकार आणि पर्यावरणप्रेमींनी पावले उचलणे, हीच मिश्रा यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
2023-06-09T07:48:59Z dg43tfdfdgfd