Aryan Mishra Murder: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये कथित गोरक्षकांनी गायींच्या तस्करीचा संशय घेऊन बारावीचा विद्यार्थी आर्यन मिश्रा याची हत्या केली. २३ ऑगस्टच्या रात्री दिल्ली-आग्रा महामार्गावर गोरक्षकांनी आर्यन मिश्राच्या गाडीचा ३० किलोमीटर पर्यंत पाठलाग करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर गोरक्षक आणि त्यांच्या उच्छादाबद्दल पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. गायींच्या तस्करीचा फक्त संशय आल्यामुळे सदर हत्या झाली. यानंतर पोलिसांनी लाइव्ह फॉर नेशन या संघटनेचा अध्यक्ष अनिल कौशिकला अटक केली. अटकेनंतर आर्यन मिश्राच्या वडिलांशी बोलताना आरोपी अनिल कौशिकने माफी मागितली. तसेच आर्यनला मुस्लीम समजून आपण गोळी घातली. एका ब्राह्मण मुलाची आपल्याकडून हत्या झाल्याचा पश्चाताप वाटत असल्याचे अनिल कौशिकने सांगितले.
आर्यन मिश्राची हत्या झाल्यानंतर फरीदाबादमध्ये शोककळा पसरली आहे. आर्यन मिश्रा हा एका मध्यम वर्गीय कुटुंबाचा होतकरू मुलगा होता. आर्यनचे वडील सियानंद मिश्रा यांनी म्हटले की, इतका गोळीबार होऊनही नेमकी माझ्या मुलालाच कशी गोळी लागली. फक्त गायींची तस्करी होते या संशयावरून कुणीही कुणावर गोळ्या कशा काय झाडू शकते? मी पंडित आहे. माझे कुणाशीही वैर नाही. आम्ही पोट भरण्यासाठी फरीदाबादमध्ये आलो होतो. पण आता आम्ही आमच्या हुशार, गुणी मुलाला गमावून बसलो.
२३ ऑगस्टच्या रात्री १० वाजता आर्यन मिश्रा त्यांचा शेजारी राहणाऱ्या हर्षीतसह बाहेर फिरायला आला होता. त्यांच्यासह हर्षीतचा भाऊ शँकी, आई आणि शेजारी राहणारी किर्ती शर्माही होती. जवळच असलेल्या वर्धमान मॉलमध्ये न्युडल्स खान्यासाठी हे लोक बाहेर पडले होते.
तेवढ्यात आरोपी अनिक कौशिक यांच्या संघटनेला गायींची तस्करी करणारे काही लोक डस्टर कंपनीच्या गाडीतून येणार असल्याची गूप्त माहिती मिळाली होती. योगायोगाने आर्यन आणि त्याचे मित्रही तशाच प्रकारच्या डस्टर गाडीतून प्रवास करत होते. तसेच हर्षीतचा भाऊ शँकी हा एका खूनाच्या प्रकरणातील आरोपी होता. त्यामुळे जेव्हा आरोपी अनिल कौशिकच्या गाडीने त्यांचा पाठलाग केला, तेव्हा त्यांनी गाडी वेगाने पळवली. तब्बल ३० किमीपर्यंत हे पाठलाग नाट्य चालले.
त्यानंतर अनिल कौशिकने केलेल्या गोळीबारात एक गोळी आर्यनला लागली. गोळी लागल्यानंतर गडपुरी टोल प्लाझाजवळ हर्षीतन गाडी थांबवली. त्यानंतर अनिल कौशिक आणि इतर आरोपी गाडीतून उतरले आणि त्यांनी आर्यनच्या छातीत दुसरी गोळी घातली. मात्र गाडीत त्यांनी नजर मारल्यानंतर दोन महिला दिसल्या. ज्यावरून आपण चुकीच्या व्यक्तीला गोळी झाडल्याचे त्यांचे लक्षात आले.
द प्रिंटने दिलेल्या बातमीनुसार आर्यनचे वडील सियानंद मिश्रा यांनी सांगितले की, मी अनिल कौशिकला प्रश्न विचारला की, त्याने मुस्लीम मुलालाही अशाप्रकारे गोळी झाडली असती का? फक्त गायींसाठी गोळ्या झाडल्या जातात? तुम्ही पोलिसांनाही सांगू शकत होतात. कायदे हातात घेणारे तुम्ही कोण? पण माझ्या प्रश्नावर आरोपी कौशिकने उत्तर दिले नाही.
2024-09-04T12:28:40Z dg43tfdfdgfd