- अदिती जोगळेकर
पुढील १५०-२०० वर्षांत पृथ्वीवरील खनिजसंपत्ती अपुरी पडू लागेल. ही कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खनिजस्रोत शोधणे अनिवार्य आहे. असा एक खनिजस्रोत लघुग्रहांच्या (asteroid) रूपाने आपल्या सूर्यमालेतच आहे. त्याचा प्रत्यक्ष वापर करता येईल का, याचा अभ्यास सुरू आहे. ग्रहांच्या निर्मितीदरम्यान पूर्णत्वाला न गेलेल्या, खडकाळ खगोलीय वस्तू म्हणजे लघुग्रह.
सूर्यमालेतील १० लाखांहून अधिक लघुग्रहांपैकी बहुतांश लघुग्रह मंगळ आणि गुरूमधील पट्ट्यात आढळतात. काही अधूनमधून ग्रहांच्या आजूबाजूला फिरकतात. वैज्ञानिकांनी पृथ्वीनजीकच्या अवकाशातील १६ हजार लघुग्रहांची माहिती आणि नमुने गोळा केले आहेत. बहुतांश लघुग्रहांवर कार्बन संयुगांचे महाप्रचंड साठे, जैविक फॉस्फरस संयुगे आणि पाण्याचे गोठलेले साठे आढळतात. खते, शेतीउपयोगी कार्बनी संयुगे आणि अवकाशमोहिमांमध्ये पाण्याची गरज भागवण्यासाठी ते उपयोगी ठरतील. इतर दोन प्रकारच्या लघुग्रहांत सिलिकॉन संयुगे, लोह, निकेल, कोबाल्ट, ऱ्होडियम, प्लॅटिनम, सोने आणि अतिदुर्मिळ धातूंचे मोठ्ठाले साठे आढळतात. ‘१६ साइक’ नामक लघुग्रह त्याचे उत्तम उदाहरण आहे. वैज्ञानिकांच्या मते त्यावरील लोह आणि निकेलचे अजस्र साठे जगभरातील बांधकाम, यंत्रनिर्मिती आणि शस्त्रास्त्र निर्माण उद्योगांना अनेक दशके कच्चा माल पुरवू शकतील.
लघुग्रहांवरील खाणकाम पर्यावरणासाठीही फायद्याचे ठरेल. खनिज शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत सल्फ्युरिक आम्ल, सायनाइड, पारा आणि आर्सेनिक संयुगांसारखी विषारी रसायने वापरली जातात. ती आजूबाजूच्या माती व पाण्यामध्ये मिसळून प्राणी व वनस्पतींसाठी जीवघेणी ठरतात. परिणामी खनिज उत्पादन कारखान्यांच्या आजूबाजूच्या परिसंस्था अनेकदा पूर्णपणे उध्वस्त होऊन जातात. त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू आणि हरितगृह वायू हवाप्रदूषण व तापमानवाढीमध्ये भर घालतात. शिवाय या प्रक्रियांमध्ये कोट्यवधी लिटर शुद्ध पाणी वापरले जाते व ते मानवी वापरासाठी निरुपयोगी होते. लघुग्रहांवरील खाणींमधून खनिजे मिळू लागल्यास यातील अनेक समस्यांची तीव्रता थोडीफार तरी कमी होईल . विज्ञानकथांमध्ये शोभणारी ही संकल्पना वास्तवात उतरवता येईल का, याचा तपास करण्यासाठी जगभरातील संशोधक अभ्यास करत आहेत.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-09-04T08:49:02Z dg43tfdfdgfd