NITIN GADKARI ON SHIVAJI MAHARAJ STATUE: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक

Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ज्याचे पडसाद राज्यात उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी माफी मागितली. आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुतळा उभारणी करताना स्टेनलेस स्टिलचा वापर करायला हवा होता, असे विधान केले आहे. समुद्र किनारी खारे वारे असल्यामुळे येथे स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर पुतळा कोसळला नसता, असे विधान दिल्ली येथील एका कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी यांनी केले.

तर पुतळा कोसळला नसता

“मागच्या तीन वर्षांपासून समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या रस्ते आणि त्यावरील पुलासाठी स्टेनलेस स्टिलचा वापर करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. मी मुंबईत असताना ५५ उड्डाण पूल बांधले होते. त्यावेळी एका व्यक्तीने मला उड्डाण पुलांची पाहणी करण्यासाठी बोलावले. पुलाचे बांधकामात वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्यांवर तो पावडर कोटिंग करून वापरत असल्याचे दिसले. यावर प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, यामुळे सळ्या गंजरोधक होतात. पण तरीही सळ्यांना गंज पकडल्याचे मला दिसले. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून तीन किमीच्या अंतरावर असलेल्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर झाला पाहिजे, असे मत मी मांडत आलो. जर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा पडला नसता.

शरद पवारांनी गडकरींच्या विधानाला दिला दुजोरा

नितीन गडकरींच्या विधानाबाबत आज शरद पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, नितीन गडकरी केंद्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांनी एखादे काम हाती घेतले, तर ते मन लावून ते काम करतात. त्या कामाचा बारकाईने अभ्यास करतात. कामाचा दर्जा चांगला राहिल याची काळजी घेतात. देशामधील अनेक रस्ते त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधले आहेत. आम्ही हे संसदेतही मोकळेपणाने सांगितले आहे. नितीन गडकरी यांनी पुतळ्याच्या कामाबाबत काही मत व्यक्त केले असेल तर त्याचा नक्कीच अभ्यास त्यांनी केला असेल.

शिल्पकार जयदीप आपटेंविरोधात लुकआऊट नोटीस

मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांना गुंगारा देत असल्याने लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी लुकआऊट नोटीस काढली आहे. सध्या त्याच्या शोधार्थ ७ पथके कार्यरत आहेत. मात्र तो सापडला नसल्याने लुकआऊट नोटीस काढली आहे असे पोलिसांनी सांगितले. मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे या प्रकरणी तपास करत आहेत. सध्या बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिस कोठडी मध्ये आहे. त्याला पोलीस चौकशीसाठी ५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

2024-09-04T05:58:53Z dg43tfdfdgfd