हिमालयाच्या कुशीत वसलेल्या सिक्कीमला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हिमतलाव फुटून आलेल्या महापुराचा म्हणजेच ‘ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड’चा (जीएलओएफ) भीषण तडाखा बसला होता. या आपत्तीमुळे धोकादायक हिमतलावांचा प्रश्न ठळकपणे अधोरेखित झाला. त्यामुळे हिमालयातील अति-धोकादायक हिमतलावांचा अभ्यास करण्याची महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सिक्कीममधील दुर्गम, डोंगराळ भागातील सहा तलावांचा अभ्यास सुरू झाला आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या (एनडीएमए) पुढाकाराने ‘ग्लेशियल लेक ससेप्टिबिलिटी असेसमेंट स्टडी’ हा अभ्यास हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत या अतिधोकादायक तलावांमधील पाण्याचे प्रमाण, खोली, उतार आदींचा अभ्यास करण्यात येईल. तेनचुंगखा, खांगचुंग चो, लाचेन खांगत्से, लाचुंग खांगत्से, ला त्शो आणि शाको चो अशी या सहा तलावांची नावे आहेत. बॅथीमेट्री सर्वेक्षणाआधारे तलावांचे आकारमान निश्चित केले जाणार आहे. इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी टोपोग्राफी (ईआरटी) सर्व्हे आणि ग्राउंड पेनीट्रेटिंग रडार (जीपीआर) या तंत्रज्ञानाआधारे या तलावांना तोलून धरणाऱ्या दगडांच्या भिंतीची स्थिरता आणि संभाव्य धोके यांचे मोजमाप केले जाईल. तसेच या लगतचा परिसर, तलावातून बाहेर वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह यांचे ड्रोनच्या मदतीने थ्री-डी मॅपिंग केले जाणार आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळत असून ते पाणी साचून बनलेल्या हिमतलावांची संख्या आणि आकार वाढत आहे. एनडीएमएच्या माहितीनुसार, भारतात अशा प्रकारचे १८९ अति-धोकादायक हिमतलाव आहेत आणि त्यापैकी ४० तलाव सिक्कीममध्येच आहेत. अतिउंचीवरील, दुर्गम भागातील या तलावांचा फुगवटा वाढत असल्याने तलावफुटी होऊन महापूर येण्याची टांगती तलवार कायम आहे. असे असले, तरी भूकंप, चक्रीवादळ, ढगफुटी, भूस्खलन यापेक्षा या तलावफुटीच्या संकटाचे वेगळेपण म्हणजे ते टाळणे शक्य आहे. हिमतलावफुटीचा धोका कमी करण्यासाठी या तलावांमधील पाण्याचे प्रमाण कमी करणे हा कळीचा मुद्दा आहे. संरचनात्मक तसेच बिगर-संरचनात्मक उपाययोजना करून हा धोका कमी करणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर हा अभ्यास हाती घेण्यात आला आहे.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-09-04T08:49:02Z dg43tfdfdgfd