कल्याणमध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू

कल्याण- मस्जिदीचे रंगकाम करण्यासाठी बांबूच्या परांचीवर चढलेल्या एका कामगाराचा गेल्या शुक्रवारी परांचीवरुन पाय घसरुन मृत्यू झाला. ठेकेदाराने या कामगाराला जीव सुरक्षेची कोणतीही साधने न दिल्याने या कामगाराचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढून बाजारपेठ पोलिसांनी ठेकेदारा विरुध्द चौकशीनंतर गुरुवारी गुन्हा दाखल केला.इनायतउल्ला मलिक उर्फ बाबू (३८, रा. बालाजी सोसायटी, पिंगारा बार जवळ, सूचक नाका, कल्याण) असे ठेकेदार आरोपीचे नाव आहे. दुधनाक्यावरील बोरी मस्जिद जवळील बारदान गल्लीत हा प्रकार घडला होता.

पोलिसांनी सांगितले, बोरी मस्जिदीचे आतील बाजूस पहिल्या माळा ते तिसऱा रंगकाम करण्याचे काम ठेकेदार बाबू मलिक याला देण्यात आले होते. बाबूने बिगारी कामगार जुमराती मन्सुरी (४०, रा. पिसवली) याला रंगकाम करण्यास सांगितले होते. मस्जिदीच्या बाजुने बांबुच्या परांची बांधून रंगकाम करताना ठेकेदार बाबू मलिकने कामगार जुमराती याला जीव सुरक्षेची आवश्यक साधने देऊन मगच त्याला रंगकामासाठी इमारतीवर चढविणे आवश्यक होते. त्याने कामगाराला आवश्यक साधने दिली नाहीत.रंगकाम करत असताना गेल्या शुक्रवारी कामगार तिसऱ्या माळ्यावरील परांचीवरुन पाय घसरुन कामगार खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार तातू विशे यांनी याप्रकरणी ठेकेदारा विरुध्द निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.

2023-06-09T10:45:15Z dg43tfdfdgfd