शिक्षक अवघे विश्व शांततेच्या दिशेने चालत राहावे, यासाठी चालणारा ज्ञानदूत असतो. शिक्षकात सामावलेल्या शक्तीची ओळख करून देण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी शिक्षकांच्या आंतरिक मनाला जागृत करण्यासाठी प्रतिज्ञा पेरली आहे. मोठेपणाबरोबर शिक्षकांना जबाबदारीचे भान देणारी ही प्रतिज्ञा प्रत्येकाने अभ्यासायला आणि आचरणात आणायला हवी. त्या पाऊलवाटेने आपण चालू लागलो, तर स्वतःबरोबरच राष्ट्राचे उत्थान फार दूर नाही. आजच्या शिक्षकदिनी या वाटेने चालण्याचा निर्धार केला, तर भविष्य अधिक उज्ज्वल असेल, यात शंका नाही.
शिक्षक हा भूतकाळापासूनच व्यवस्थेसाठी आदर्शवत राहिला आहे. जगाच्या शांततेसाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी मनुष्यबळ विकसित करणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याने मनात आणले तर काय परिवर्तन होते, याचा इतिहास जगाने अनुभवला आहे. शिक्षकांची शक्ती आणि अंगी असलेली भक्तीच राष्ट्राचे उत्थान घडवू शकते. त्यासाठी देशातील शिक्षक अधिक ज्ञानसंपन्न आणि जबाबदारीची जाणीव असणारे असायला हवेत. बालकांच्या आणि तरुणांच्या मनात विकासाची स्वप्ने पेरणारा शिक्षकच असतो. सर्जनशीलतेने विज्ञान, साहित्यात भरारी घेण्यासाठी मनावर पेरणी करणारा शिक्षक असतो. विकासाची द़ृष्टी देणारा शिक्षक असतो. शक्ती देणारा शिक्षक असतो. विकासाला माणूसपणाची जोड देणारा शिक्षक असतो. राधाकृष्णन यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात प्रयत्न करण्याची गरज अधिक अधोरेखित होऊ लागली आहे. अलीकडच्या काळात शिक्षकांसाठीचा विचार करताना सातत्याने जबाबदारीचे भान आणि कर्तव्याची भावना जागृत करण्याची अपेक्षा केली जात आहे. शिक्षकांच्या हाती असलेला विचार आणि शक्ती आपण समजावून घेतली, तर जगात परिवर्तनाची वाट चालणे सहज शक्य आहे. शिक्षकांच्या पेरलेल्या विचारातून जीवन समृद्धीचा प्रवास सुरू करणे शक्य होईल. शिक्षकांसाठी विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधणे, ही शिक्षकांना आवडणारी गोष्ट असायला हवी. शिक्षकांप्रति असलेली मनातील भावना म्हणजे शिक्षकांच्या प्रति असलेला आदरभाव व्यक्त करणे आहे. तो आदरभाव का, हे सांगताना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, माझ्या आयुष्यात जे काम शिक्षकांनी केले आहे. त्यातील मनापासून केलेले अध्ययन, अध्यापन आहे. खरा शिक्षक तर विद्यार्थ्यांच्या प्रेमासाठीच जगत असतो. नवनवीन पद्धतीने अध्यापन, तंत्र, अध्ययन अनुभवाची रचना जशी स्वतःला समृद्ध करते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला संस्कारित करत असते. त्यामुळे निर्माण होणारा आनंद हा शिक्षकांना आनंद देत असतो. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनाही शिकण्यात अधिक समाधान देऊन जात असतो.
कामावरील निष्ठा असल्याने पेशावर प्रेम घडणे साहजिक असते. त्या प्रेमाच्या मार्गानेच ते त्यातून स्वतःचा आनंद शोधत असतात. प्रत्येक काम आनंदाने करणे गरजेचे असते. निष्ठा असेल तर आपण त्या दिशेने अधिक समृद्धतेचा प्रवास करत जातो. परिचयहीही अधिक संपन्नतेने व्हावा, याकरिता शिक्षक कार्यरत राहतो. विद्यार्थी हे त्यांच्यासाठी सर्वस्व असतात. त्याच्या विकासात शिक्षकांचे अनन्यसाधारण योगदान असते. विद्यार्थ्यांच्या प्रति असलेले प्रेमच त्यांच्यासाठी प्रेरक असते, त्यामुळे शिक्षकांची निष्ठा स्वतःच्या व्यवसायाशी जितकी अधिक असेल तितका आदरभाव अधिक असणार आहे. शिकवण्यावर माझे प्रेम आहे, असे सांगताना अध्यापन किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते. भारतीय तत्त्वज्ञानाप्रति असलेली पाश्चात्त्यांच्या द़ृष्टिकोनातही त्यांनी मूलभूत परिवर्तन करण्याचे काम केले आहे. शिकवण्यावर प्रेम असणारा माणूस आपण जे शिकवितो, त्या घटकाभोवतीचा भवताल जाणून शिकविण्याचा प्रयत्न करत असतो. त्या शिकविण्यावरती त्याचे अखंड प्रेम असते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीत विद्यार्थ्यांचे हित सामावलेले असते. शिकवलेले विद्यार्थ्याच्या गळी उतरवण्यासाठी अनेकदा नावीन्यपूर्ण प्रयत्न केले जात असतात. एखाद्या विद्यार्थ्याला जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत मी शिकवत राहीन, असे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटले होते.
2024-09-05T01:46:21Z dg43tfdfdgfd