'मोकारपंती' WHATSAPP GROUP चा पहिला SCREENSHOT समोर! आंधळे म्हणाला, 'हाच तो मस्साजोगचा...'

Santosh Deshmukh Murder Case Mokarpanti Whatsapp Group Screenshot: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला आजपासून सुरुवात झाली. सुनावणीच्या पहिल्या दिवशी आरोपींच्या 'मोकारपंती' या व्हॉट्सअप ग्रुपवरील संवादासंदर्भातील खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली त्या दिवशी या व्हॉट्सअप कॉलवर आरोपींनी इतरांना आरोपींनी नेमकं काय दृष्य दाखवण्यात आलं हे याच ग्रुपवरील एका सदस्याने कोर्टासमोर दाखल केलेल्या जबाबामध्ये सविस्तरपणे सांगितलं आहे.

स्कॉर्पिओमधून दोनदा व्हिडीओ कॉल

मोकारपंती ग्रुपवर एक नव्हे दोनवेळा व्हिडीओ कॉल करण्यात आला होता. मोकारपंती ग्रुपवरील व्हिडिओ कॉलचा संवाद चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आला आहे. पहिला व्हिडीओ कॉल 5 वाजून 15 मिनिटाला करण्यात आला तर दुसरा व्हिडीओ कॉल 5 वाजून 30 मिनीटांनी केला गेला. 

कृष्णा आंधळे म्हणाला, 'हाच तो मस्साजोगचा सरपंच जो...'

मोकारपंती ग्रुपमध्ये एकूण 14 सदस्यांचा समावेश आहे. मोकारपंती ग्रुपचा अॅडमीन कृष्णा आंधळे आहे. जयराम चाटे ही या ग्रुपमध्ये होता. दोन्ही व्हिडीओ ग्रुप कॉल कृष्णा आंधळेनेच केले होते. ग्रुपवर करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉलमध्ये संतोष देशमुख काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये जखमी अवस्थेत पडल्याचे दिसत होते. संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे त्यांची काळी-निळी झालेली पाठ कृष्णा आंधळे व्हिडीओ कॉल करुन इतर सदस्यांना दाखवत होता. "हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे, जो त्या दिवशी सुदर्शन भैय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता," असं कृष्णा आंधळे व्हिडीओ कॉलमध्ये म्हणाल्याचं या ग्रुपचा सदस्य असलेल्या दत्ता मैंद याने कबुली जबाबात सांगितलं आहे. 

व्हिडीओ कॉलवर कोणकोण होतं?

तर व्हीडिओ कॉलवर जॉईन झालेला गणेश बसवर या कॉलदरम्यान, "सरपंचाला लय मारलं आहे. बास करा इतकं मारू नका," असं कृष्णा आंधळेला सांगत होता. मात्र कृष्णा आंधळे 2 ते 3 वेळेस मोबाईल संतोष देशमुखांच्या तोंडाजवळ नेऊन त्याचा चेहरा दाखवत होता. संतोष देशमुखांच्या चेहऱ्यावर जखमा होऊन त्यातून रक्त येताना व्हिडीओ कॉलमध्ये दिसत होतं, असंही जबाबात म्हटलं आहे. कृष्णा आंधळे व्हिडीओ कॉलमध्ये मोबाईल आजूबाजूला फिरवून दाखवत होता व्हिडीओ कॉलमध्ये महेश केदार, जयराम चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व प्रतिक घुलेसुध्दा दिसत होता अशी सगळी माहिती चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आली आहे.

मोकारपंती ग्रुपचा स्क्रीनशॉट समोर

मोकारपंती ग्रुपचा डिस्प्ले फोटो कसा होता हे सुद्धा चार्जशीटमध्ये जोडण्यात आलं आहे. मोकारपंती ग्रुपच्या डीपीमध्ये टू पीस कपडे परिधान केलेली एक तरुणी दिसत आहे. 

मोकारपंती ग्रुपवरील कॉल महत्त्वाचा पुरावा

या मोकारपंती ग्रुपवरील व्हिडीओ कॉल आणि तिथे पाठवण्यात आलेले फोटो या प्रकरणामधील महत्त्वाचा पुरावा असल्याने या जबाबामधून डिजीटल पुराव्यांना दुजोरा देणारा घटनाक्रम समोर आला आहे. 

2025-03-12T08:05:30Z