AADHAAR SIM CARD LINK SCAM: आधार आणि सिम कार्ड लिंक स्कॅमच्या माध्यमातून ८० लाखांची फसवणूक, असा करा बचाव

भारतात ऑनलाइन फसवणूक सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांनी ऑनलाईन घोटाळ्यात लाखो, करोडो रुपये गमावले आहेत. घोटाळेबाज देखील लोकांची फसवणूक करून त्यांचे पैसे लुटण्यासाठी सतत नवनवीन मार्ग शोधत असतात. आता चंदीगढमध्ये एका महिलेची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची ताजी घटना समोर आली आहे. या महिलेला गुन्हे शाखेचे अधिकारी सांगून भामट्याने फसवणूक केली. या प्रकरणाची विशेष बाब म्हणजे फसवणूक करणाऱ्यांनी पीडितेला घाबरवण्यासाठी आधार कार्ड आणि सिम कार्ड लिंकचा वापर केला.

गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासविले

ट्रिब्यून इंडियाच्या वृत्तानुसार, सेक्टर 11, चंदीगड येथे राहणाऱ्या एका महिलेला मुंबई क्राइम ब्रँचचे पोलिस म्हणून भासवून एक फसवणुकीचा फोन आला. या भामट्याने महिलेला घाबरवून तिच्या आधारकार्डवर घेतलेले सिमकार्ड बेकायदेशीरपणे पैसे कमावण्याच्या धंद्यात वापरले जात असल्याचे सांगितले. फसवणूक करणाऱ्याने खात्री पटवण्याचा प्रयत्न करत पीडितेला सांगितले की, बेकायदेशीरपणे पैसे ट्रान्सफर केल्याबद्दल त्यांच्यावर 24 गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर अटक करण्याची धमकीही दिली. भीतीपोटी आणि कायदेशीर त्रास टाळण्यासाठी पीडितेने फसवणूक करणाऱ्याच्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन केले.

80 लाख रुपये केले जमा

प्रकरण सोडवण्यासाठी, कॉलरने सांगितले की तपासाचा भाग म्हणून, पीडितेला एका विशिष्ट बँक खात्यात 80 लाख रुपये जमा करावे लागतील. ती निर्दोष सिद्ध झाल्यास पैसे परत केले जातील असेही सांगण्यात आले. आपल्यावरील आरोप खोडण्याच्या घाईत, महिलेने पैसे ट्रान्सफर केले, परंतु नंतर तिची फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. पीडितेला फसवणूक झाल्याचे समजेपर्यंत फसवणूक करणारा गायब झाला होता आणि पैसे परत मिळणे अशक्य होते. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

असे घोटाळे कसे टाळायचे?

  • कॉलरची ओळख नेहमी तपासा.
  • वास्तविक सरकारी अधिकारी फोनवर तुमची वैयक्तिक माहिती किंवा पैसे कधीही विचारणार नाहीत.
  • संस्थेला थेट त्यांच्या व्हेरीफाईड फोन नंबरवर कॉल करून स्वतः माहिती काढा.
  • तुमचा आधार क्रमांक, बँक तपशील किंवा OTP सारखी संवेदनशील माहिती फोनवर कधीही शेअर करू नका. कोणतीही खरी संस्था अशी माहिती मागणार नाही.
  • तुम्हाला घाबरवणाऱ्या आणि घाईघाईने निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या फोन कॉल्सपासून सावध रहा.
  • वास्तविक पोलीस कायदेशीर पद्धती वापरतात आणि फोनवर अटकेची धमकी देत नाहीत.
  • तुम्हाला संशयास्पद कॉल आल्यास, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या.
  • दुसरे मत अनेकदा घाईघाईने घेतलेला निर्णय थांबवू शकते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-10T04:41:34Z dg43tfdfdgfd