CM SHINDE: शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीवर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. पवारांच्या कन्या, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज, शुक्रवारी सकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसळकर यांना भेटून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या जम्मू काश्मीरमध्ये असून त्यांनी ट्विट करून या प्रकरणावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे. तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.’

शिवसेनेच्या ठाकरे गटावर मुख्यमंत्री शिंदेंची अप्रत्यक्ष टीका

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे लिहितात, ‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत. त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल.’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पोलीस आयुक्तांनी विवेक घेतली गृहमंत्री फडणवीस यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरुन धमकी आली, त्याची शहानिशा करुन कारवाई करा असा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिला आहे. शरद पवार यांना धमकी आल्यानंतर आयुक्त फणसळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.

2023-06-09T10:57:47Z dg43tfdfdgfd