EPF INTEREST RATE : मोठी बातमी! ईपीएफच्या व्याजदरात वाढ, ६ कोटी कर्मचाऱ्यांना थेट फायदा

EPF interest rates Hike : देशातील सहा कोटी ईपीएफओ खातेधारकांना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं नवं आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी मोठी भेट दिली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) ईपीएफवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यानुसार हा दर ८.१० वरून आता ८.१५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळं आता पीएफ खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर अधिक व्याज मिळणार आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटनेची शिखर संस्था असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोमवारपासून ही बैठक सुरू होती. चर्चेअंती आज ०.०५ टक्के व्याज वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय आते केंद्र सरकारच्या अर्थ खात्याला कळवला जाईल. अर्थ खात्याची मंजुरी मिळताच निर्णयाची अंमलबजावणी होईल.

PAN Aadhaar Linking : पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाइन

२०२१-२२ या आर्थिक वर्षात ईपीएफवरील व्याजदर ८.१० टक्के होता. मागच्या ४० वर्षांतील हा सर्वात कमी दर होता. यावेळी त्यात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मोठी नसली तरी त्यामुळं ईपीएफओच्या कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

असं आहे व्याजाचं गणित

कर्मचाऱ्याचा मूळ पगार आणि महागाई भत्त्याच्या १२ टक्के रक्कम ईपीएफओमध्ये गुंतवली जाते. त्यात संबंधित कर्मचाऱ्याच्या कंपनीकडून तितकेच, म्हणजे १२ टक्के योगदान दिले जाते. यातील ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेत (EPS) तर, ३.६७ टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (EPF) जमा होते. ईपीएफ खात्यात जमा झालेल्या या रकमेवर व्याज मिळते.

एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात १ लाख रुपये जमा असल्यास त्याला त्यावर वर्षाला ८.१५ टक्के दराने ८,१५० रुपये व्याज मिळते. याआधी ते ८,१०० रुपये होते, म्हणजेच त्यात आता ५० रुपयांची वाढ होणार आहे.

Changes from 1 April : वार्षिक ७ लाख रुपये पगार असेल तर ‘नो टॅक्स टेन्शन’, १ एप्रिलपासून नवे नियम

आतापर्यंतचे व्याजदर

२००५ ते २०१० पर्यंत ईपीएफवर ८.५० टक्के, २०१०-११ मध्ये ९.५० टक्के, २०१२-१३ मध्ये ८.५० टक्के आणि २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के व्याज मिळत होते. २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के, २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के व्याज होते. २०२०-२१ मध्ये ते ८.५० टक्क्यांपर्यंत खाली गेले, तर २०२१-२२ मध्ये ते ८.१० टक्क्यांच्या चार दशकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

2023-03-28T13:56:23Z dg43tfdfdgfd