महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे. गणरायाचा सर्वांत मोठा उत्सव सुरू होत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या आठ मंदिरांच्या स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत. मुद्गल पुराणात तसंच इतर काही पुराणांत मंदिरांचे उल्लेख आढळतात. आठही गणपती स्वयंभू आहेत. या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची श्रद्धा आहे.
मयूरेश्वर (मोरगाव) मोरगावला असलेला मयूरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे. हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे. या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे. त्याचमुळे याचं नाव मयूरेश्वर असं पडलं. गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. या गणपतीला तीन डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवले आहेत. डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे. नेहमी भगवान शंकरांच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथं मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे, हे इथलं वैशिष्ट्य आहे. मंदिराला असलेले चार दरवाजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीकं मानले जातात.
सप्टेंबर महिन्यातलं चंद्रग्रहण भारतातून दिसेल का? जाणून घ्या ग्रहणाचा कालावधी
श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक) सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथं आहे. हा अष्टविनायकातील दुसरा गणपती. या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे. मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूंचं युद्ध सुरू होतं. अनेक वर्ष हे युद्ध चाललं, पण विष्णूंना यश मिळत नव्हतं. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितलं. त्यानंतर विष्णूंनी मधु व कैटभ राक्षसांना इथं ठार केलं. म्हणूनच इथं विष्णूंचं मंदिरही पाहायला मिळतं. सिद्धिविनायकाची मूर्ती 3 फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. हा उजव्या सोंडेचा गणपती आहे.
श्री बल्लाळेश्वर (पाली) रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे. गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं. भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं. तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्रीगणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथं दर्शन दिलं. पुढे अनेक वर्षं या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीने सांगितलं. तोच हा पालीचा बल्लाळेश्वर.
श्री वरदविनायक (महड) रायगड जिल्ह्यातल्याच महड गावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे. हा वरदविनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जातं. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रिद्धीसिद्धीच्या मूर्ती आहेत. त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते. मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत.
श्री चिंतामणी (थेऊर) पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे. मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे. गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून, पूर्वाभिमुख आहे. डाव्या सोंडेचा हा गणपती असून, त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत. मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे रूप डोळ्यांचं पारणं फेडतं. सर्व चिंता नष्ट करणारा, विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो. माधवराव व रमाबाई पेशवे यांचं स्मरण येथे आल्यावर होतं. रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे.
श्री गिरीजात्मज (लेण्याद्री) पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरीजात्मजाचं मंदिर आहे. डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे. तसंच हे मंदिर बौद्धगुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलंय. गिरीजा हे देवी पार्वतीचं नाव असून, तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथं आहे. एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं आहे. मंदिराला जवळपास 300 पायऱ्या आहेत. या डोंगरात 18 बौद्धगुहा आहेत. त्यापैकी आठव्या गुहेत गिरीजात्मजाचं मंदिर आहे.
श्री विघ्नेश्वर (ओझर) अष्टविनायकातील हा सातवा गणपती. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे. श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे. या ठिकाणी गणपतीनं विघ्नासुर नावाच्या असुराचा वध केला होता. तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर, विघ्नहर्ता असं नाव पडलं, अशी एक आख्यायिका आहे.
श्री महागणपती (रांजणगाव) पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथं श्री महागणपतीचं मंदिर आहे. गणेशाचं सर्वांत शक्तिशाली, प्रभावशाली महागणपतीचं रूप इथं आहे. कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी व सिद्धीदेखील आहेत. गजाननाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं. यात गणपतीला 10 सोंडी व 20 हात आहेत. या गणपतीला पेढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे.
महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्त्व आहे. या सर्व मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे, तसंच काही पौराणिक कथाही त्यामागे जोडलेल्या आहेत. भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
2024-09-05T01:43:28Z dg43tfdfdgfd