विरार : प्रसिद्धीच्या झोतात असलेली आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नृत्यांगना गौतमी पाटीलभोवती तिच्या आडनावाचा वाद सुरू झाला आहे. मराठा समन्वयक राजेंद्र पाटील यांनी गौतमी पाटील हिने पाटील हे आडनाव वापरू नये असे सांगत इशारा दिला होता. गौतमी पाटील हिने जर आपले पाटील हे आडनाव लावले तर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका राजेंद्र पाटील यांनी घेतली. त्यावर गौतमी पाटील हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपण मागे हटणार नसल्याचे गौतमीने स्पष्ट केले आहे.
गौतमी पाटील हिचे खरे आडनाव पाटील हे नसून ते चाबूकस्वार असे आहे असे मराठा संघटनांनी जाहीर केले होते. त्यावर गौतमी पाटील हिने सडेतोड उत्तर दिले आहे. मी पाटीलच आहे आणि हे नाव मी वापरणारच असे गौतमीने ठामपणे म्हटले आहे. विरार येथील खार्डी गावात आज गुरुवारी सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी मला काही फरत पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. माझे हे कार्यक्रम चांगले पार पडत आले आहेत, असे गौतमीने म्हटले आहे.
गौतमीने यावेळी आपल्या टीकाकारांना आवाहनही केले आहे. माझ्या कार्यक्रमावरून ज्या कोणाला प्रश्न असतील त्यांनी माझा कार्यक्रम पाहायला यावे आणि माझा कार्यक्रम त्यांनी पूर्ण पाहावा, असे गौतमी पाटील म्हणाली.
2023-05-25T17:46:01Z dg43tfdfdgfd