MUMBAI GOA HIGHWAY TRAFFIC : चाकरमानी निघाले गावाला; मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या 6-7 किमी रांगा

Mumbai goa highway traffic : मुंबई आणि नवी मुंबईसह पश्चिम उपनगर आणि शहराच्या विविध भागांमधून सध्या चाकरमानी गावाची वाट धरतान दिसत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे येऊ घातलेल्या गणेशोत्सवाचं. अवघ्या काही तासांमध्येच गावागावात, घराघरात गणपतीच्या आरतीचे सूर कानी पडणार असून, याच मंगलमय वातावरणाचे साक्षीदार होण्यासाठी सध्या अनेक चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. पण, त्यांची ही वाट मात्र अपेक्षेहून मोठी असणार आहे. कारण, गुरुवारी पहाटेपासूनच मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे इथं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. बुधवारी रात्रीपासून महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं निदर्शनास आलं. या वाहतूक कोंडीमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी अडकले असून महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे ही वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढताना दिसत आहे. साधारण तासाभरापर्यंत वाहनं जागीच ठप्प असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. सध्या दोनी मार्गिकांवर वाहनं आल्यामुळं महामार्गावर ही कोंडीची समस्या उद्भवली असून, ही कोंडी जवळपास 6 ते 7 किमीपर्यंत आहे. 

दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी चाकरमानी गावाची वाट धरतील. एसटी, खासगी बस आणि खासगी वाहनांपासून रिक्षा आणि लहान मालवाहू वाहनांच्या गर्दीमुळं मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या या चित्रात पुढील दोन ते तीन दिवसात फारसे बदल दिसणार नाहीत. 

हेसुद्धा वाचा : Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गच नव्हे, 'या' पर्यायी मार्गांनी गाठता येईल कोकण; Traffic Jam टाळण्यासाठी आताच पाहून घ्या

 

रायगड पोलीस गणेश भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज 

गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात निघाले असतानाच यादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या प्रवासात चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये, विशेषतः वाहतूक कोंडीची समस्या फार काळ टिकू नये यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. वाहतूक कोंडीची ठिकाणे हेरून तिथं विशेष नियोजन करण्यात आलं आहे. महामार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते दुभाजक लावण्यात आले असून, यंदा प्रथमच पोलीस यंत्रणा ड्रोनचा वापर करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान या समस्येवर आणखी एक तोडगा म्हणजे महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे शिवाय एसटी बसेसचे थांबे शहराबाहेर करण्यात आले आहेत. 

2024-09-05T01:59:36Z dg43tfdfdgfd