NASHIK ACCIDENT : मिनी टेम्पोवर आदळून दुचाकीस्वार ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

थांबलेल्या मिनी टेम्पोवर आदळून टेम्पोतील गज पोटात शिरल्याने दुचाकीस्वार व्यक्ती ठार झाल्याची घटना विल्होळी जकात नाक्याजवळील पेट्रोल पंपासमोर घडली. या अपघातात दीपक धर्मा आहेर (४१, रा. गणेश चौक, सिडको) यांचा मृत्यू झाला आहे.

दीपक आहेर हे सोमवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजता एमएच १५ सीवाय ०१२८ क्रमांकाच्या दुचाकीवरून नाशिकहून वाडीवऱ्हेच्या दिशेने जात हाेते. त्यावेळी खासगी कंत्राटदाराकडील एमएच 09 सीए ८०३५ क्रमांकाचे वाहन आग्रा राेडवर उभा हाेता. टेम्पोत लांब आकाराचे गज भरलेले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आहेर यांच्या दुचाकीस पाठीमागील दुसऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते टेम्पाेवर जाऊन आदळले. टेम्पाेतून बाहेर आलेले गज पाेटात शिरल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. गाैळाणे येथील शंकर तपासे यांनी आहेर यांना तातडीने रुग्णवाहिकेमार्फत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी तपासून आहेर यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post Nashik Accident : मिनी टेम्पोवर आदळून दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

2023-03-28T03:26:32Z dg43tfdfdgfd