SATARA RAIN : जिल्ह्याच्या पश्चिमेला संततधार सुरूच

सातारा/परळी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्यांच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असली, तरी पावसाचा जोर ओसरला आहे; मात्र धोम, वीर, कण्हेर व उरमोडी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने दि. 3 ऑगस्टअखेर ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, धोमनंतर आता उरमोडीमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दुपारनंतर उघडझाप सुरू होती. मात्र, पश्चिम भागात पावसाची संततधार कायम होती. जोरदार वार्‍यामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. पावसाळी पर्यटनासाठी कास, यवतेश्वर, ठोसेघर, चाळकेवाडी, सज्जनगड, बामणोली, तापोळा, पाचगणी महाबळेश्वर परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे.

गतवर्षी दुष्काळाचे चटके सहन करावे लागल्याने सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला होता. तसेच जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. जुलैमध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाल्याने इतर धरणांमधील विसर्ग सुरू झाला. मात्र, उरमोडी भरलेच नव्हते. अखेर बुधवारपासून उरमोडीतूनही विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे. 5 हजार क्युसेकने उरमोडी नदीत केला जात आहे.

जुलैमध्ये काही दिवस झालेला मुसळधार पाऊस व मागी काही दिवसांतील संततधार पावसामुळे उरमोडी धरणाची पाणीपातळी 692.80 मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे बुधवारपासून विसर्ग करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी जास्त केला जाणार आहे. सध्याच्या घडीला धरणामत 7.39 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धरणात 2 हजार 969 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दोन दिवसांपूर्वीच उरमोडी प्रकल्पाच्या पायथा विद्युतगृहातून 500 क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. उरमोडी धरणाचे पाणलोट क्षेत्र कास तलाव आणि सांडवली हे आहे. धरणाखालील नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, असे आवाहन उपविभागीय अभियंता अमित तपासे, सहा.अभियंता गणेश कणसे यांनी केले आहे.

आसरे बोगद्यातून धोम बलकवडी कालव्यामध्ये 200 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे. वीर धरणातून 32 हजार 459 क्युसेक्स विसर्ग निरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. विविध धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सातारा जिल्ह्यात बुधवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 36.9 मि.मी., जावली 34.0 मि.मी., पाटण 46.8 मि.मी., कराड 36.4 मि.मी., कोरेगाव 15.9 मि.मी., खटाव 13.0 मि.मुी., माण 5.8 मि.मी., फलटण 3.7 मि.मी., खंडाळा 6.6 मि.मी., वाई 14.0 मि.मी., महाबळेश्वर 47 मि.मी. पावसाची नोंद झाली.

2024-08-01T00:15:02Z