मुंबई : ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी प्रवाशांचे हाल सुरु झाले होते. दोन दिवस प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पण आज अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटी कर्मचारी संघटनांनी मंगळवारी अघोषित संप पुकारल्याने राज्यभरातील प्रवाशांचे हाल झाले होते. मुंबईत सीएम शिंदेंनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली यामध्ये सुरुवातीलाच राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही असे बोलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे घेतला. यानिर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ६५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बुधवारी राज्यात गणेशोत्सावामुळे १,००६ उत्सव विशेष जादा गाड्या चालवण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले होते. यामुळे नियमित फेऱ्यांसह विशेष फेऱ्यांमधील प्रवाशांच्या चिंतेत भर पडली. एसटी चालक-वाहकांअभावी अनेक स्थानक-आगारांत गाड्या उभ्या असल्याने संपाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच काल मंगळवारी महामंडळाला सुमारे १४ कोटींच्या महसुल तोटा सहन करावा लागला आहे. आज काही वेळापूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला अशी घोषणा केली आहे. आज दिवसभर सुमारे २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. आज दिवसभरात ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या २५१ पैकी ९४ आगार पुर्णतः बंद होते. ९२ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर ६५ आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरु होती.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-09-04T16:38:57Z dg43tfdfdgfd