कोल्हापुरात दंगल नुकसानीचे पंचनामे सुरू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्याने जमावाकडून दुकाने, वाहने, घरांची तोडफोड करण्यात आली. एका समाजाच्या मालमत्ता यामध्ये टार्गेट करण्यात आल्याने यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी याचे पंचनामे पूर्ण करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले. यामध्ये सुमारे 8 ते 10 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सर्वाधिक तोडफोड पापाची तिकटी, महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड या परिसरात झाली आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये दुकानांचे बोर्ड, दर्शनी काचा, चप्पल दुकाने, कपड्यांचे दुकान, रिक्षा, दुचाकी यांचे नुकसान झाले आहे.

तातडीने पंचनामे

लक्ष्मीपुरी पोलिस व जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने पंचनामे पूर्ण केले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्यांच्या हद्दीत 16 रिक्षा, 6 दुचाकी, 25 दुकानांचे फलक, 2 घरे, 2 खाद्यपदार्थ गाड्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये अंदाजे 4 लाख 80 हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. तर जुना राजवाडा पोलिसांनी 9 दुकाने, रिक्षा यांचे मिळून 2 लाख 95 हजारांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे.

गुन्हे दाखल

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पाहून आणखीन

काहींची नावे निष्पन्न करण्याचे काम सध्या सुरू आहे.

विशिष्ट भागात तोडफोड

बिंदू चौक, सबजेल रोड, भाऊसिंगजी रोड, पापाची तिकटी, महाद्वार रोडवरील विशिष्ट भागातच तोडफोड जमावाकडून करण्यात आली. दुकाने, घरांसोबत रिक्षा, दुचाकींचाही यामध्ये समावेश आहे.

The post कोल्हापुरात दंगल नुकसानीचे पंचनामे सुरू appeared first on पुढारी.

2023-06-09T08:52:21Z dg43tfdfdgfd