DEVENDRA FADNAVIS ON SHIVAJI MAHARAJ: “माझं एकच म्हणणं आहे की…”, देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर स्पष्टीकरण, म्हणाले…

Devendra Fadnavis on Shivaji Maharaj Surat Visit: गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर विरोधकांकडून परखड शब्दांत टीका केली जात आहे. शिवाजी महाराजांनी दोन वेळा सूरत लुटल्याचं प्रत्युत्तर विरोधकांकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत असताना आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या सागर बंगल्यावर आज गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांना टोला लगावत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. “बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज आहे. मी त्यांची नावं घेणार नाही. पण सर्वांना सद्बुद्धी मिळो, अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“गणेशाने सर्वांचे दु:ख हरावे, सर्वांचे विघ्न दूर करावे, महाराष्ट्राला स्थैर्य व भरभराट मिळावी अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना केली आहे. मला विश्वास आहे की अतिशय उत्साहात हा गणेशोत्सव महाराष्ट्रात व देशात साजरा होईल”, असंही ते म्हणाले.

खंडणी विधानावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

दरम्यान, जयंत पाटील यांनी केलेल्या खंडणीबाबतच्या विधानावरही फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. “शिवाजी महाराजांनी आधी सूरतला नोटीस पाठवून खंडणी मागितली होती. त्यानंतर सूरत लुटण्याचा निर्णय घेण्यात आला”, असं विधान जयंत पाटील यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं होतं. त्यावरून फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी टीका केली.

Chhatrapati Shivaji Maharaj looted Surat: छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती? राष्ट्रवादी – भाजपामध्ये ‘खंडणी’ शब्दावरून जुंपली

“ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं, त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक असणारे सदानंद मोरे, शिवरत्न शेट्ये अशा सगळ्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझं एकच म्हणणं आहे की माझा राजा लुटारू नव्हता. माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही”

“माझं स्पष्ट मत आहे की महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही. त्यांनी कधीही लूट केलेली नाही. सर्वसामान्यांना त्यांनी कधीही त्रास दिलेला नाही. जर इतिहासात काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील, तर त्या सुधारल्या पाहिजेत. कारण शेवटी हे सगळं लिहिणारा इंग्रजांचा इतिहासकार आहे. इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतून शिवाजी महाराजांना पाहण्याऐवजी आपल्या सगळ्या इतिहासकारांनी सोबत यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं असेल, ते सुधारण्याचा प्रयत्न करावा”, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

2024-09-07T08:14:53Z dg43tfdfdgfd