EVM वर मोदींचा फोटो नव्हता, महिलेचा मतदानास नकार, पंतप्रधान भावूक होत म्हणाले…

देशभरात उद्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण ८८ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून तब्बल १,२०६ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे. याआधी १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान घेण्यात आलं होतं. पहिल्या टप्प्यात ६५.५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. काही भागांमध्ये मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला तर काही ठिकाणी लोकांनी मतदानकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी राजस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. राजस्थानच्या एका खेड्यांत राहणारी महिला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचली तेव्हा तिला ईव्हीएम मशीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोच दिसला नाही. त्यामुळे तिला धक्का बसला. तसेच तिने मतदान केंद्रावर उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी केवळ मोदींनाच मत देणार आहे. मोदी यांनी या घटनेची माहिती दिली तसेच देशभरातील भाजपा कार्यकर्ते आणि बुथ कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा सल्लादेखील दिला आहे.

ही घटना राजस्थानच्या सीकर लोकसभा मतदारसंघामधील पिपरानी गावात घडली आहे. सीकर लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान झालं. या दिवशी पिपरानी येथील एका शाळेत मतदान केंद्र बनवण्यात आलं होतं. या मतदान केंद्रावर बरीच गर्दी होती. सकाळी ११ च्या दरम्यान, काही ग्रामीण महिला गाणं म्हणत मतदान केंद्रावर दाखल झाल्या. यापैकी एक महिला मत देण्यासाठी आत गेली आणि त्यानंतर आतमधून गोंधळ ऐकू येऊ लागला. त्यानंतर सर्वजण आत गेले. तेव्हा सर्वांनी पाहिलं की मत द्यायला आत गेलेली महिला मतदानास नकार देत होती. कारण तिला ईव्हीएम मशीनवर मोदींचा फोटो दिसला नाही.

भाजपा कार्यकर्ते लक्ष्मीकांत भरद्वाज यांनी या घटनेबाबत वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचा फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींनादेखील टॅग केलं आहे. या बातमीनुसार मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी महिलेला समजावून सांगितलं की, ईव्हीएम मशीनवर मोदींचा नव्हे तर मोदींच्या पक्षाच्या चिन्हाचा फोटो असतो. तसेच तिला सांगितलं की, तुमच्या मतदारसंघात मोदी नव्हे तर त्यांच्या पक्षाचा एक उमेदवार निवडणूक लढतोय. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर त्या महिलेने मतदान केलं.

हे ही वाचा >> “…म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”, राऊतांचा विशाल पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यामागे…”

यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, माता-भगिनींकडून मिळणारं हे प्रेम पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. या महिलांचं कर्ज फेडण्याचा आम्ही संकल्प केला आहे. परंतु, लक्ष्मीकांत जी, या घटनेमुळे एक गोष्ट समोर आली आहे की, आपल्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, मतदानामधील या बारीक-सारीक गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. यासाठी आपल्याला लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना जागरुक करावं लागेल.

2024-04-25T13:20:53Z dg43tfdfdgfd