PM MODI BRUNEI VISIT: मोदींची पूर्वाभिमुखता, द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रुनेई आणि सिंगापूर या देशांचा ताजा दौरा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. हिंद-प्रशांत महासागर टापूतील देशांशी संबंध वाढविण्यासाठी मोदी सरकारने आखलेल्या पूर्वाभिमुख धोरणाला पूरक असाच हा दौरा होता. द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान. मलय द्वीपसमूहातील ब्रुनेईचे स्थान महत्त्वाचे आहे. दक्षिण चीन समुद्रापासून फार लांब नसलेल्या या देशाशी संबंध वृद्धिंगत करणे, आग्नेय आशियात प्रभाव निर्माण करण्यासाठी आणि टिकविण्यासाठी आवश्यक आहे. ब्रुनेईचे पाश्चिमात्य देशांशी संबंध अतिशय चांगले आहेत. या टापूत चीनला अटकाव करण्यासाठी असलेल्या ‘क्वाड’ या समूहाचा भाग असल्याने ब्रुनेईशी संबंध वाढविण्यात भारताला अडचण नाही. मोदी यांच्या दौऱ्यात ते दिसलेही. त्यांचे तिथे जंगी स्वागत झाले. संरक्षण, अवकाश आदी क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासाठी दोहोंनी दाखवलेली कटिबद्धता ही या दौऱ्याची फलश्रुती.

सिंगापूर हा आग्नेय आशियातील भारताचा सर्वांत मोठा व्यापारी सहकारी आहे. गेल्या वर्षीच्या देशातील परकी गुंतवणुकीत सिंगापूरचा क्रमांक सहावा होता. गेल्या २४ वर्षांत सिंगापूरकडून भारतात एकत्रित १६० अब्ज डॉलर गुंतवणूक झाली आहे. यावरून सिंगापूरचे महत्त्व लक्षात येईल. तेथील पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी बोलताना मोदींनी वेगळ्या शब्दांत ही बाब नमूद केली. विकसनशील देशांसाठी सिंगापूर हे प्रेरणास्थान असल्याचे मोदींचे वक्तव्य त्या देशाचे बलस्थान अधोरेखित करणारे होते. भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचे उद्दिष्ट मोदींनी ठेवले आहे; त्याचा उल्लेखही त्यांनी केला. ‘सिंगापूर’ निर्माण करणे ही सोपी बाब नाही. विकासाच्या दृष्टीबरोबरच सर्व प्रकारची पोषकताही त्यासाठी निर्माण करावी लागते.

दहा वर्षांपूर्वी मोदी ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न बघत होते. देशातील शंभर शहरांची निवडही झाली. प्रत्यक्षात शहरे काही ‘स्मार्ट’ झाली नाहीत. त्यामुळे ‘सिंगापूर’ निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. त्यासाठी सिंगापूरशी सहकार्य महत्त्वाचे ठरू शकेल. गेल्या दहा वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुपटीने वाढला. भारताच्या अर्धवाहकांच्या (सेमीकंडक्टर) उत्पादनाला चालना देण्यासाठी मोदींचा हा दौरा उपयुक्त ठरू शकेल. सिंगापूरनेही याबाबत सहकार्याचे आश्वासन दिले. मोदींची ही पूर्वाभिमुखता एकूणच सामरिक आणि व्यापारी संबंधांच्या वृद्धीसाठी उपयुक्त ठरणारी आहे. आता गरज आहे, ती अंमलबजावणीची.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-07T06:50:12Z dg43tfdfdgfd