SUPRIYA SULE: हातात शरद पवारांचा फोटो, समोर लेकीचं भाषण, बारामतीतला प्रतिभा पवारांचा फोटो व्हायरल

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा मंगळवारी पार पडतो आहे. महाराष्ट्रातल्या ११ लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडतं आहे. बारामती, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, माढा यासह ११ मतदारसंघांमध्ये मंगळवारी निवडणूक पार पडणार आहे. या मतदारसंघांसाठी प्रचार रविवारी थांबला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण हा सामना सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा आहे. या लढाईकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार असंही पाहिलं जातं आहे. बारामतीतल्या सभेतला एक फोटो व्हायरल झाला आहे.

व्हायरल फोटोमध्ये काय?

बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी जी प्रचारसभा घेण्यात आली त्या प्रचारसभेतला प्रतिभा पवारांचा फोटो व्हायरल झाला आहे. प्रतिभा पवार यांनी हातात शरद पवारांचा फोटो घेतला होता आणि त्या लेकीचं भाषण ऐकत होत्या असा हा फोटो आहे. संपूर्ण पवार कुटुंब एकीकडे आणि अजित पवार आणि त्यांचं कुटुंब एकीकडे असं चित्र पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत पाहण्यास मिळतं आहे. अजित पवार यांनीही बारामतीत प्रचारसभा घेतली. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे. आता बारामतीत बाजी कोण मारणार? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुप्रिया सुळेंच्या आई प्रतिभा पवार या शरद पवारांचा फोटो हातात घेऊन लेकीला बळ देताना दिसल्या.

सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत प्रचारसभा पार पडली

सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीत प्रचारसभा पार पडली. या सभेत रोहित पवार भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. शरद पवारांसह झालेल्या संवादाची आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. रोहित पवारांच्या डोळ्यांत जे अश्रू आले त्याची अजित पवारांनी खिल्ली उडवली आणि तसंच रडूनही दाखवलं. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहित पवार, युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांच्यासह पवार कुटुंबातले अनेक सदस्य सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आल्याचं बारामतीकरांनी पाहिलं.

हे पण वाचा- Baramati Loksabha 2024: बारामतीमध्ये सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? कुणाचं पारडं जड? जाणून घ्या!

प्रतिभा पवार यांचा फोटो व्हायरल

प्रतिभा पवार यांचा याच सभेतला फोटो व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हा फोटो व्हायरल केला आहे. बारामती या ठिकाणी जेव्हा सुप्रिया सुळेंची सभा होती त्यात शरद पवारांची प्रकृती बिघडली. त्यांचा घसा बसला, शब्द फुटेनासे झाले. त्यांचा आवाज कातरल्याचंही पाहण्यास मिळालं. तरीही पाच मिनिटं भाषण करुन बारामतीकरांना आवाहन केलं.

शरद पवार यांनी मागच्या २० दिवसांणध्ये ५० हून अधिक सभा घेतल्या. फक्त सुप्रिया सुळेच नाही तर इतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही प्रचारसभा घेतल्या. प्रचारसभांच्या दौऱ्यांचा ताण पडल्याने त्यांची प्रकृती बिघडली. सध्या ते आराम करत आहेत.डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी आजच्या दिवसातील त्यांचे सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. बीड दौरा आणि पुण्यातील आजची सभा रद्द करुन शरद पवार आज बारामतीतच आहेत. उद्या ७ मे रोजी ते बारामतीमध्येच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

2024-05-06T11:33:29Z dg43tfdfdgfd