अडते व्यापाऱ्यांवर हल्ला करत ५० लाखांची लूट; दोघे जखमी,नेप्ती कांदा मार्केटजवळील घटना

नगर : दोन अडते व्यापाऱ्यांवर कोयत्याने हल्ला करत त्यांच्याकडील ५० लाखांची रोकड हल्लेखोरांनी पळवून नेली. शहराजवळील नेप्ती उपबाजार समितीजवळ (कांदा मार्केट) आज, शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळपर्यंत हल्लेखोरांचा तपास लागलेला नव्हता. पाळत ठेवून ही घटना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हल्ल्यामध्ये शोएब अन्वर सय्यद (३५, रा. हाजी इब्राहिम बिल्डिंग, स्टेशन रस्ता, नगर) व त्यांचा भाऊ सोहेल अन्वर सय्यद हे दोघे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.

शहराजवळ केडगाव बाह्यवळण रस्त्यावर नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केट (उपबाजार) आहे. या ठिकाणी सय्यद बंधूंचा गाळा आहे. तेथे ते कांदा अडत म्हणून व्यवसाय करतात. आज सकाळी १०.३० च्या सुमारास केडगाव बाह्यवळण रस्त्यावरून कांदा मार्केटकडे ते आपल्या टोयाटो मोटारीतून जात असतानाच पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट मोटार व मोटरसायकलने धडक दिली. त्यातील सहा जणांनी त्यांना अडवले, खाली उतरण्यासाठी धमकावू लागले. सय्यद बंधूंनी प्रतिकार सुरू करताच हल्लेखोरांनी त्यांच्या व मोटारीच्या काचा फोडल्या व दोघांवर कोयत्याने वार केले. त्यांच्याकडील रोख ५० लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळ काढला. माहिती मिळाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांच्यासह बाजार समितीच्या संचालक मंडळाने रुग्णालयात जाऊन जखमी व्यापाऱ्यांची विचारपूस केली.

हेही वाचा >>> कोकणात जाणाऱ्या एसटी टोलसाठी रोखल्याने आनेवाडीजवळ तणाव

शनिवारी उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव असतात. त्यामुळे मोठी उलाढाल होते. सय्यद बंधू हे बडे व्यापारी आहेत. त्यामुळे लिलावाच्या दिवशी त्यांच्याकडे मोठी रोकड असते हे लक्षात घेऊनच पाळत ठेवली गेली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. त्यातील एकाने चेहरा झाकला होता. तो सय्यद बंधूंच्या परिचयाचा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून स्थानिक गुन्हे शाखेसह कोतवाली पोलिसांच्या एकूण २९ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली तीन पथके यासाठी नियुक्त करण्यात आली आहेत.

आंदोलनाचा इशारा

दरम्यान बाजार समितीचे संचालक, अडते व्यापारी, हमाल, मापाडी यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक खैरे व शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती यांची भेट घेत निवेदन दिले. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला तसेच नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली.

2024-09-08T00:00:29Z dg43tfdfdgfd