तुरूतुरू

‘ही चाल तुरूतुरू उडती केस भुरूभुरू’ हे गाणे सुरू झाले, की अख्ख्या सभागृहाने धरलेला ठेका आणि ‘वन्समोअर’चा घोष हे कायमचे ठरलेले. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या युवतीचे वर्णन करणारे हे गीत. यातील ‘तुरूतुरू’ हा शब्द तिच्या चालण्याचे चपखल वर्णन करणारा. खरा शब्द तुरतुर. विस्तारित शब्दरत्नाकरमध्ये याचा अर्थ येतो लवकर, पाय जमिनीला विशेष न टेकता, वरवर. या गाण्यात ‘पाय जमिनीला विशेष न टेकता’ हा अर्थ अधिक योग्य होतो; कारण ते वयच पाय जमिनीवर नसण्याचे असते.

आपल्या विचारांत, आपल्या तंद्रीत, काही वेळा स्वप्नात वावरण्याचे, ते सारे सत्य मानण्याचे आणि त्यातही ‘त्याचा’ अथवा ‘तिचा’ पुसटसा भास झाल्यानंतर जमिनीवर चार अंगुळे चालण्याचे असते. या गाण्यातील ‘डाव्या डोळ्यावर बट ढळलेली’ नायिका गीतकाराला त्याच वयातील दिसते; त्यामुळे तिच्या चालण्याचे वर्णन तो ‘तुरूतुरू’ या शब्दात करतो. हेच वर्णन छोट्या मुला-मुलींनाही लागू पडते. आई-वडिलांचा हात सोडून नुकतेच स्वतंत्रपणे चालू लागलेल्या मुलांचे वर्णन ‘तुरूतुरू’ असेच करतात. त्यांचेही पाय जमिनीला विशेष टेकत नाहीत, ते अजून नीट तोल सावरता येत नसल्याने किंवा तितका आत्मविश्वास नसल्याने; पण हे चालणे भलतेच गोड असते. त्याची तुलना कशाशीही करता येत नाही आणि ते चालणे पाहण्याचा आनंद शब्दांतही व्यक्त करता येत नाही. अर्थात, पहिल्या प्रकाराने चालण्याचीही तीच गोष्ट आहे. या दोन्हींत एक साम्य आहे. या दोन्ही वयांतील व्यक्तींना आपण तुरूतुरू चालतो आहोत, हे समजत नसते. दोन्ही बाबतींत पाहणाऱ्यांच्याच ते लक्षात येते.

दोन्हीकडे घरांतील ज्येष्ठांचे बारीक लक्ष असते. तोल जाऊ नये, यासाठी ते दक्ष असतात. आधीच्या ‘तुरूतुरू’बाबत त्यात थोडी कठोरता असते आणि त्या वयातील बंडखोर स्वभावाला अनुसरून त्या कठोरतेला तितक्याच तीव्रतेचा विरोध असतो. दुसरीकडे मात्र गंमत असते. ‘अले पल्ला असता ना...’ असे बोबडे बोल असतात. एकीकडे, नुकतेच उमलणारे मन, शरीर यांचा तोल सावरायचा असतो, तर दुसरीकडे स्वतंत्रपणे पावले टाकायची असतात. एकीकडे डोळ्यांत नवी स्वप्ने असतात, नवे जग असते; तर दुसरीकडे दिसणारी प्रत्येक गोष्ट चाखून पाहायची असते. आनंद दोन्हीकडे असतो. तुरूतुरू चालणे नखऱ्याचे, नव्या जगाचे आणि नव्या पावलांचेही होऊन जाते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-20T08:08:50Z dg43tfdfdgfd