पीडितांना न्याय हवा

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित अश्लील व्हिडीओचे प्रकरण लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत समोर आले असल्याने त्याकडे राजकीय चिखलफेक म्हणून पाहिले जाण्याचा धोका आहे. वास्तविक हे महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर प्रकरण आहे. प्रज्वल यांचा कथित सहभाग असलेले अडीच हजारांहून अधिक व्हिडिओ उघडकीस आल्याने या प्रकरणाकडे लैंगिक गुन्ह्याचे प्रकरण म्हणून पाहायला हवे. प्रज्वल यांचे आजोबा माजी पंतप्रधान, काका एच. डी. कुमारस्वामी माजी मुख्यमंत्री, वडील एच. डी. रेवण्णा माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आहेत.

स्वत: प्रज्वल कर्नाटकातील हासन येथील खासदार आहेत आणि यंदाही ते लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. २६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांच्या व्हिडीओंची चर्चा सुरू झाली. त्यामुळे हा राजकीय कट असल्याचा दावा प्रज्वल यांनी केला; मात्र महिलांचे लैंगिक शोषणाच्या या प्रकरणातील अनेक व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने या प्रकरणी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली असून, त्याद्वारे आता चौकशी होईल. या प्रकरणातील व्हिडीओंमध्ये बदल, फेरफार केल्याचा आरोप प्रज्वल यांनी केला आहे; मात्र, पीडित महिलांच्या साक्षींतून, व्हिडीओ अस्सल असल्याबद्दलच्या पाहणीतून सत्य बाहेर येईल. प्रज्वल यांनी चौकशीला सामोरे जायला हवे; परंतु ते जर्मनीत असल्याचे वृत्त आहे. आपल्या मुलाने पलायन केले नसल्याचा दावा एच. डी. रेवण्णा यांनी केला असून, ‘एसआयटी’समोर तो हजर होईल, असेही म्हटले आहे. खुद्द रेवण्णा यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप आहेत.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन देवेगौडा कुटुंबाने आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) या पक्षाने प्रज्वल यांच्यापासून फारकत घेतली आहे. त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ‘जेडीएस’बरोबर युती केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील भाजपच्या मौनाकडे राजकीय हितसंबंधांतून पाहिले जात आहे. त्यामुळे केवळ स्थानिक भाजप नेत्यांनीच नव्हे, तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी. ‘जेडीएस’चे बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित अशा या प्रकरणाचा राजकीय वापर होणार नाही, याची काळजी कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल. या प्रकरणाचा पूर्ण छडा लावून सर्व पीडित महिलांना न्याय मिळायला हवा.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-01T06:25:00Z dg43tfdfdgfd