पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष! मेळघाटातील हे गाव आहे २८ वर्षांपासून टँकरग्रस्‍त; महिलांना…

अमरावती : मेळघाटमधील खडीमल गावात गेल्‍या २८ वर्षांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. गावातील महिलांना पिण्याचे आणि वापरण्यासाठी लागणारे पाणी मिळविण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. टँकरने पाणी विहिरीत सोडण्यात येत आहे. विहिरीत सोडण्यात आलेल्‍या पाण्‍याचा उपसा करण्‍यासाठी महिलांना जीव धोक्‍यात घालून विहिरीच्या काठावर उभे रहावे लागते. जिल्हा मुख्यालयापासून शंभर किलोमीटर अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात वसलेले चिखलदरा तालुक्यातील खडीमल गाव पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी धडपड करीत आहे.

मेळघाटातील नवलगाव, चुनखडी, बिच्‍छुखेडा, माडीझडप या गावांमध्‍ये देखील तीव्र पाणीटंचाई असून गावातील लोकांना गढूळ पाणी प्‍यावे लागत आहे. खडीमलच्या विहिरीतील पाणी सुमारे ३०० फूट खाली गेले आहे. या गावात वर्षानुवर्षे टँकरने पाणी पुरवण्‍यात येते. मात्र, गावात टँकरने पाणी पुरवठा करण्‍याची निश्चित वेळ ठरलेली नाही. किती टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार, या बाबतसुद्धा स्पष्ट माहिती दिली जात नाही. गावात आणि आजूबाजूच्या गावात ट्रॅक्टर आणि टँकर आहेत. मात्र, प्रशासन बाहेरच्या ट्रॅक्टर आणि टँकरच्या मदतीने खडीमल गावात पाणी पुरवठा करीत आहे. खडीमल गावातील लोकांना नियमित पाणी मिळावे म्हणून आतापर्यंत आपल्या प्रशासनाने किमान २ कोटी रुपये खर्च केले असावे, असा आमचा अंदाज असल्‍याचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. बंड्या साने यांनी सांगितले.

हेही वाचा – ग्रामीण भाषाशैली, वैदर्भीय स्टारप्रचारकाने महाराष्ट्र गाजवला

हेही वाचा – फेरनिविदेऐवजी मुदतवाढीचा पर्याय! नागपूर महापालिकेची चलाखी; १३०० कोटींचे बस खरेदी प्रकरण

खडीमल गावातील लोकांना नियमित पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ३ हातपंप, तलाव, विहिरी खोदण्यात आल्या होत्या मात्र सर्व पाणी पुरवठा करणाऱ्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. जलजीवन मिशनसह अनेक योजना राबवूनही खडीमल गाव पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहे. गेल्या २८ वर्षांपासून सरकार खडीमल गावाला टँकरमुक्त करू शकले नाही, ही शोकांतिका असल्‍याचे बंड्या साने यांचे म्‍हणणे आहे. सुमारे १३०० लोकसंख्येच्या या गावाकडे एकही अधिकारी किंवा नेता फिरकत नाही, असे गावकरी सांगतात.

2024-05-07T07:51:23Z dg43tfdfdgfd