प्रवाळभिंतींचे 'ब्लीचिंग'

- मयुरेश गांगल

जागतिक हवामान बदलाचे पर्यावरणाच्या अनेक पैलूंवर परिणाम दिसून येतात. या १५ एप्रिलपासून लक्षद्वीप द्वीपसमूहात प्रवाळभिंती ब्लीच होण्यास, म्हणजेच पांढऱ्या पडण्यास व्यापक प्रमाणामध्ये सुरुवात झाली आहे. उष्णतेमुळे प्रवाळावर पडणाऱ्या तणावाचे हे लक्षण आहे. हा तणाव उथळ पाण्यातील आणि लगूनमधील प्रवाळांच्या जीवितहानीस कारणीभूत ठरू शकतो.

दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेचा हवामान विभाग व सागरी वातावरण प्रशासन संस्था यांनी उष्णकटीबंधीय प्रदेशात जागतिक पातळीवर असे ब्लीचिंग सुरू झाल्याचा इशारा दिला होता. जागतिक हवामान बदलांमुळे होणारे हे ब्लीचिंग सन १९९८पासून चौथ्यांदा जागतिक पातळीवर घडत आहे. पाण्याच्या वाढत्या तापमानामुळे प्रकाशसंश्लेषण करून स्वतःसाठी आणि प्रवाळ प्राण्यासाठी अन्न तयार करणारी सूक्ष्म वनस्पती प्रवाळ जिवामधून बाहेर येते. परिणामी प्रवाळांचा रंग जाऊन, ती पांढरी पडतात. या ब्लीचिंगमुळे प्रवाळांच्या पोषणाचा प्राथमिक स्रोतच हरवतो. तापमान लवकर उतरले नाही, तर प्रवाळ उपाशी राहून मरतात. पॅसिफिक महासागरात एल निनो ज्या वर्षी सक्रिय होतो, त्या वर्षी भारतीय उपखंडात पाण्याच्या तापमानवाढीमुळे असे ब्लीचिंग होत असल्याचे दिसते.

‘नेचर कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन’ ही संस्था लक्षद्वीपमध्ये २५ वर्षांपासून प्रवाळांवर संशोधन करत आहे. या संशोधकांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच प्रवाळांचे रंग उडत असल्याचे आढळले होते. सन १९९८पासून अशा ब्लीचिंगमुळे लक्षद्वीपच्या प्रवाळ भिंतींमध्ये जिवंत प्रवाळांच्या प्रमाणात २५ टक्क्यांनी घट झाली आहे. पुढील काही दिवसांत पाण्याच्या तापमानात घट झाली नाही किंवा मान्सून लांबला, तर या वर्षी प्रवाळांची मोठी हानी होण्याची भीती फाउंडेशनने व्यक्त केली आहे.

हवामान बदलाचे दुष्परिणाम, सागरपातळीतील वाढ आणि वाढती चक्रीवादळे यांपासून बचावासाठी लक्षद्वीपवासी या जिवंत प्रवाळ भिंतींवर पूर्णपणे अवलंबून आहेत. १९९८पासून ब्लीचिंगच्या घटनांची वारंवारता वाढली आहे. सुमारे ७० हजार लोकवस्तीच्या लक्षद्वीप बेटांच्या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे. (उत्तरार्ध)

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-02T07:14:07Z dg43tfdfdgfd