भूगोलाचा इतिहास: भाकितांचा भूतकाळ

एल के. कुलकर्णी

ही गोष्ट १८५४ ची. इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एक खासदार बोलत होते. ‘विज्ञानात नुकत्याच झालेल्या प्रगतीमुळे आपण आता अशा स्थितीत आलो आहोत की, उद्या लंडनचे हवामान कसे असेल हे २४ तास अगोदरच कळू शकेल.’ त्यांचे हे वाक्य ऐकताच सभागृहात मोठाच हशा पिकला. हजारो वर्षांपासून लोकांना असे वाटे की हवामान हे पूर्णत: विस्कळीत, ताळतंत्ररहित (chaotic) असून त्याला कोणत्याही नियमात, सूत्रात बांधणे शक्य नाही. त्यामुळे हवामानाचे भाकीत ही कल्पनाच त्या सभागृहाला हास्यास्पद वाटली होती.

तसे हवामानाचा अंदाज बांधण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून चालू होते. इ.स. पूर्व ६५० मध्ये बॅबिलोनियन लोक ढगांकडे पाहून व तारे ग्रहावरून काही अंदाज बांधत. इ. स. पूर्व चौथ्या शतकात अरिस्टॉटलने आपल्या ‘मटेरिओलॉजिका’ या ग्रंथात काही हवामान नमुने (पॅटर्न) दिले होते. पुढे थिओफ्रास्टस याने तर हवामानविषयक संकेतांवर ‘बुक ऑफ साईन्स’ नावाचे पुस्तकच लिहिले. चिनी, ईजिप्शियन व इतर लोकांत प्राचीन काळापासून या संदर्भात काही लोकसंकेत व समजुती रूढ होत्या. भारतातही वेदकाळापासून आकाशाचे रंग, ग्रह, नक्षत्रे इ. च्या आधारे हवामानाचे काही ठोकताळे बांधले जात. वराहमिहिराने पर्जन्याच्या भाकितासंबंधी काही संकेत दिले आहेत. याशिवाय ‘सहदेव भाडळी’ सारखे काही स्थानिक लोकसंकेतांचे संग्रहही हवामानाच्या अंदाजासाठी प्रचलित होते. हे सर्व पारंपरिक ठोकताळे किंवा संकेत मुख्यत: तारे ग्रह, राशी, नक्षत्रे, ढग, सूर्योदय वा सूर्यास्ताचे आभाळरंग, सूर्य चंद्राचे खळे, काही प्राणी वनस्पतींचे वर्तन यावर आधारित होते. तसेच ती अनुमाने स्थानिक व त्या काही तासांनंतरची असून त्यात फक्त पाऊस पडेल का यासंबंधी अंदाज असे.

चांगले हवामान भाकीत हे परिपूर्ण, नेमके व विश्वसनीय असते. परिपूर्ण म्हणजे त्यात केवळ पाऊसच नव्हे तर त्यासोबत तापमान, आर्द्रता, वारे, धुके याबद्दलही पूर्वानुमान आवश्यक आहे. तसेच ते नेमके – म्हणजे कुठे, केव्हा, किती व कसे हे सांगणारे व मोजता येईल अशा स्वरूपात असले तरच ते उपयुक्त व पडताळण्याजोगे ठरते. हवामानाचा असा शास्त्रशुद्ध अभ्यास व त्याआधारे पूर्वानुमान किंवा भाकीत याची खरी सुरुवात १९ व्या शतकात झाली. १८३० ते १८४० मध्ये विकसित झालेल्या तारायंत्राच्या शोधाने हवामानशास्त्रात क्रांती घडवून आणली.

फ्रान्सिस बुफर्ट (वाऱ्याच्या वेगासंबंधीच्या बुफर्ट स्केलचे जनक) आणि रॉबर्ट फिट्झरॉय (चार्ल्स डार्विनमुळे प्रसिद्ध झालेल्या बीगल या जहाजाचे कप्तान) हे दोघे आधुनिक हवामान भाकितांचे जनक मानले जातात. १८५४ मध्ये इंग्लंडच्या फिट्झरॉय यांची नेमणूक सागरी हवामानासंबंधीच्या खात्याचे प्रमुख म्हणून झाली. १८५९ मध्ये एका वादळात इंग्लंडचे रॉयल चार्टर नावाचे जहाज बुडाले. यातूनच फिट्झरॉय यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी ठरवले की विविध ठिकाणच्या हवामानविषयक नोंदींचे संकलन करून असे तक्ते तयार करावे की त्याआधारे भाकीत सांगता येईल. हवामान भाकीत (वेदर फॉरकास्ट) हा शब्दही त्यांचाच. यासाठी १५ हवामान केंद्रे स्थापन करून तेथील नोंदी तारेने त्यांच्या केंद्रीय कार्यालयास पाठवण्याची व्यवस्था केली गेली. त्याआधारे तक्ते तयार होत. १८६१ मध्ये ‘द टाइम्स’मध्ये पहिले हवामान भाकीत प्रकाशित करण्यात आले. लवकरच वादळाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा बेटावर उभी करण्यात आली. १८६१ मधील फिट्झरॉय यांचे हवामानावरील पुस्तक त्या काळाच्या मानाने फार पुढे होते. पुढे सर्व देशांनी हवामान केंद्रांचे जाळे उभारून अशी भाकिते सांगण्याचे तंत्र विकसित केले.

भारतात हवामानाचा शास्त्रशुद्ध अभ्यास एकोणिसाव्या शतकात सुरू झाला. त्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने १७८५ मध्ये कोलकाता येथे, १७९३ मध्ये मद्रास येथे वेधशाळा स्थापन केल्या. पण त्या मुख्यत: खगोलशास्त्रीय होत्या. पुढे १८२३ मध्ये मुंबईला कुलाबा येथे हवामान वेधशाळा स्थापन करण्यात आली. एक ब्रिटिश नाविक व संशोधक हेन्री पेडिंग्टन यांनी भारतातील वादळांचा सखोल अभ्यास करून ‘लॉज ऑफ स्टॉर्म’ हा प्रबंध १८४२ मध्ये प्रकाशित केला होता. या प्रकारच्या वादळांना ‘सायक्लोन’ किंवा चक्रीवादळ हा शब्दही त्यांनीच सुचवला. १८६४ मध्ये कोलकात्याला एक मोठे चक्रीवादळ धडकले, तर १८६६ व १८७३ मध्ये भीषण दुष्काळ पडला. आता मात्र सर्व हवामानशास्त्रीय नोंदींचे संकलन एकाच ठिकाणी करण्याची गरज निर्माण झाली. यातूनच १५ जानेवारी १८७५ रोजी भारतीय हवामान खात्याची स्थापना करण्यात आली. त्याचे मुख्यालय सुरुवातीला कोलकात्याला होते. १८७८ पासून सर्व केंद्रांवरील माहितीच्या आधारे दैनंदिन हवामान अहवाल – इंडियन डेली वेदर रिपोर्ट (IDWR) – तयार करण्याचे काम सुरू झाले. नंतर विविध प्रांत व राज्याच्या सरकारांनी वेधशाळा स्थापन केल्या. कोलकात्यात १८८४ मध्ये व मुंबईत १९०४ मध्ये स्थापन झालेल्या एशियाटिक सोसायटीने हवामानशास्त्राच्या अभ्यासाला विशेष उत्तेजन दिले.

१८८७ मध्ये पहिले हवामान तक्ते छापण्यात आले होते. १९०५ मध्ये फुग्यांचा मागोवा घेऊन वातावरणाच्या वरच्या थरांचे मोजमाप व अभ्यास सुरू झाला. हवामान खात्याचे मुख्यालय पुढे १९०५ मध्ये शिमल्याला, १९२८ मध्ये पुण्याला व अखेर १९४४ मध्ये दिल्लीला हलवण्यात आले. १९४९ मध्ये भारतीय हवामान खाते जागतिक हवामान संस्थेचे सदस्य बनले. १९५४ मध्ये हवामानाच्या अभ्यासासाठी विमानाचा वापर सुरू झाला. १९६४ पासून भारताने अमेरिकेच्या उपग्रहांकडून ‘उपग्रह प्रतिमा सेवा’ घेण्यास सुरुवात केली. भारतीय हवामान खात्यास १०० वर्षे पूर्ण झाली त्या वर्षी, १९७५ मध्ये, भारताने ‘आर्यभट्ट’ हा स्वत:चा पहिला कृत्रिम उपग्रह व नंतर अनेक कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले. १९८२ मध्ये खास हवामानासाठी म्हणून भारताने स्वत:चा इन्सॅट हा दूरसंवेदी कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला तर १९८३ मध्ये अंटार्क्टिका येथे पहिले हवामान केंद्र स्थापन केले. टप्प्याटप्प्याने या क्षेत्रातील सर्व अद्यायावत तंत्रज्ञान व सुविधा भारताने प्राप्त केल्या.

आज मोबाइलवरही शास्त्रीय हवामान भाकिते उपलब्ध आहेत. त्यांच्यामागे अशी दीर्घ तपश्चर्या व परंपरा आहे. पण दुर्दैवाने शास्त्रीय भाकिताकडे पाहण्याची बऱ्याच जणांची दृष्टी उपहासाची आहे. अर्थात याला कारणीभूत अपुरे ज्ञान. हवामान भाकीत म्हणजे केवळ पावसाचा अंदाज नसून त्यात वारे, तापमान, आर्द्रता, धुके, हवेची दृश्यता यांचेही भाकीत तेवढेच महत्त्वपूर्ण असते. तसेच हवामान भाकीत समजण्यासाठी त्यांची विशिष्ट परिभाषा व मर्यादा समजावून घेणे आवश्यक आहे. ते न करता, लोक आपल्या कल्पनेनुसार भाकितातील शब्दांचे अर्थ लावतात. सदैव १०० टक्के अचूक हवामान भाकीत हे तत्त्वत:च गृहीत धरले जात नाही. तसे ते अमेरिकेतही नसते. पण ज्यांना आपल्याकडे काहीजण हसतात, ती शास्त्रीय भाकिते विश्वसनीय नसती तर भारतात विमानसेवा चालू शकली नसती आणि प्रत्येक चक्रीवादळात लक्षावधी लोक मृत्युमुखी पडले असते. एका पाहणीनुसार अमेरिकेत एका वर्षात हवामान भाकिते मिळवण्यासाठी सरकार व खाजगी कंपन्यांचा एकूण खर्च ५.१ अब्ज डॉलर्स आहे. तर त्यातून मिळालेले उत्पन्न ३१.५ अब्ज डॉलर्स, म्हणजे खर्चाच्या सहापट आहे. याउलट शास्त्राधार नसणाऱ्या भाकितांबद्दल आपल्याकडे अजूनही विशेष आकर्षण आहे. कदाचित त्यामुळेच, अमेरिकेच्या सहापट लोकसंख्या असणाऱ्या भारतात शास्त्रीय भाकितातून मिळणारा महसूल फक्त एक कोटी डॉलर्स एवढा आहे. शास्त्राकडे पाहण्याची आपली दृष्टी व त्याचे फळ याचे हे उदाहरण स्वत:च पुरेसे बोलके आणि विचारप्रवर्तक आहे.

2024-07-26T18:57:19Z dg43tfdfdgfd