मतदानाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंची मोठी मागणी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, खडकवासला, दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातील १५७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करून या ठिकाणी कॅमेरे लावावेत, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महाआघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविले आहे.

बारामती शहरातील १२, बारामती ग्रामीणमध्ये ४७, दौंडमध्ये ३३, पुरंदर आणि भोरमध्ये प्रत्येकी ३१ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील तीन मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हेही वाचा – आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

बारामती, खडकवासला, दौंड आणि इंदापूर या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी अनुचित किंवा गैरप्रकार घडल्यास सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे बारामती, खडकवासला, दौंड आणि इंदापूर या विधानसभा मतदारसंघांमधील सर्व मतदान कॅमेऱ्याच्या निगराणीखाली व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – दहावी, बारावीच्या निकालात यंदा वाढ; राज्यातील दहावीचे ९९.९६ टक्के, तर बारावीचे ९९.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

या ठिकाणी अनुचित किंवा गैरप्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी घ्यावी. याबाबत यापूर्वीही इमेलद्वारे कळविण्यात आले आहे. या केंद्रांवर काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्याची पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

2024-05-06T15:49:19Z dg43tfdfdgfd