मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांची कोंडी

नांदेड : भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या विषयात केंद्र आणि राज्य सरकारला दोष देणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानी घालण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यानंतर त्यांची तेव्हाची आणि आताची वक्तव्ये समाजमाध्यमांत बघायला-ऐकायला मिळत आहेत.

भाजपात प्रवेश करण्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या विषयात अशोक चव्हाण हेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते होते. मराठा आरक्षण कायदा आणि न्यायालयीन लढ्याच्या अनुषंगाने चव्हाण यांनी गतवर्षी एक सविस्तर टिपण जारी केले होते. त्यात दिलेल्या माहितीनुसार या विषयात भाजपाच्या केंद्र सरकारने असहकार केल्याचा आरोप काही संदर्भ देत करण्यात आला होता.

मराठा आरक्षणाच्या विषयात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही, असा आरोप तेव्हा भाजपाने केला होता. पण त्याचे खंडन करण्यात काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण आघाडीवर होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न घटनादुरुस्ती करूनच सुटू शकतो, असे चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मोदींशी बोलण्याची भूमिका त्यांनी आता निवडणूक प्रचारात मांडली असून पंतप्रधान त्यांना कसा प्रतिसाद देतात, याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले होते चव्हाण?

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाच्या प्रश्नावर भाजपाची भूमिका नेहमीच नकारात्मक राहिली आहे. एकीकडे मराठा आरक्षण लागू करा म्हणून सांगायचे आणि दुसरीकडे जी बाधा आहे, ती शिथिल करण्यासाठी काडीचाही पुढाकार घ्यायचा नाही, हा दुटप्पीपणा आहे.

खासदार संभाजी राजे यांचा अपवाद वगळता भाजपाच्या महाराष्ट्रातील एकाही खासदाराने संसदेत ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याविषयी चकार शब्द काढला नाही.

हेही वाचा… ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नांदेडला येणार आहेत. मी त्यांना भेटणार आहे. मराठा आरक्षणाचा विषय त्यांना सांगणार आहे. मी बोलू शकतो. त्यांच्याशी माझी ओेळख आहे. मी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ४८ तासाच्या आता मला खासदार केले.

१७ एप्रिल २०२४

मराठा आरक्षणाचा विषय तातडीने सोडविण्याची शासनाची इच्छा आहे का, हा मुलभूत प्रश्न अनुत्तरीत आहे. या समाजाला न्याय देण्यासंदर्भात डबल इंजिन सरकार ठोस निर्णय घेत नाही. लोकांना खोटं बोलून या सरकारने झुलवत ठेवलं आहे.

हेही वाचा… Election 2024: राजकीय पक्षांसाठी काम करणारे पगारी कार्यकर्ते

तेव्हा टीका; आता गुणगान

काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीत असताना अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण विषयावर आता ते ज्या पक्षाचे खासदार झाले, त्या भाजपावर सडकून टीका केली. आता ते भाजपाचे गुणगान गात आहेत. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण ही मराठा समाजाची मागणी आहे; पण ज्या सरकारला तुम्ही ‘लोकांना झुलवणारे’ असे म्हटले, त्या सरकारबद्दल चव्हाण यांची भूमिका बदलली आहे. भाजपाचे इतर नेते नरेंद्र मोदी यांच्यासमोर ‘ब्र’ काढू शकले नाहीत, तेव्हा चव्हाण त्यांना काय बोलणार? – संदीपकुमार देशमुख, निर्भय बनो विचारपीठ, नांदेड</strong>

2024-04-19T07:03:17Z dg43tfdfdgfd