मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मंगळवारी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने सोमवारी मध्यरात्री पासून मुंबई, ठाणे आणि नवीमुंबई शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना शहरात प्रवेश देण्यात येणार आहे.

सोमवारी ईद ए मिलाद हा सण असल्याने त्या दिवशी शहरात अनेक ठिकाणी मिरवणुका निघतात. शिवाय मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन असल्याने बुधवार सकाळपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू असतात. दोन्ही सण एकत्र आल्याने मुंबईसह ठाणे आणि नवीमुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी अवजड वाहनांना शहरात बंदी घालण्यात येते. त्यानुसार यावर्षीही सोमवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना मुंबई, ठाणे आणि नवीमुंबईत प्रवेश करण्यास पूर्णतः बंदी असल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आणखी वाचा- अभिनेत्री तापसी पन्नू ब्रँड अँबेसिडर असलेल्या कंपनीवर छापा

त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील वाहने बंदीतून वगळण्यात आली आहेत. पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व जुना मुंबई पुणे या दोन्ही महामार्गावर थांबवून ठेवले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी त्यांचा वेळ आणि मालाचे नुकसान होऊ नये यासाठी या दोन्ही मार्गावरील प्रवास टाळावा असे आवाहन अपर पोलीस महासंचालक, (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आले आहे.

2024-09-16T17:34:18Z dg43tfdfdgfd