मुंबईस्थित कोकणवासिय गेले कोकणात

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी असून, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकणातील मतदारसंघात मतदान होणार आहे. यामुळे मुंबईस्थित बहुसंख्य कोकणवासिय कोकणात गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना एकत्र करून, खासगी वाहने, एसटीने कोकणातील मूळगावी नेले आहे.

मुंबई महानगरात मोठ्या संख्येने कोकणवासीय राहत असून, अनेकांचे मतदान हे कोकणातील मूळगावी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मतदारांना गोळा केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील, ठाणे जिल्ह्यातील कोकणवासियांसाठी खासगी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मूळचे रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातील मतदार नालासोपारा, बोरिवली, बदलापूर, अंबरनाथ येथे राहत आहेत. या मतदारांना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते खासगी बसने नेत आहेत. साधारणपणे ५० टक्के मुंबईस्थित कोकणवासिय मुळगावी गेले आहेत, असे कोकणवासीय दीपक चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा – जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड, मुंबईत विविध ठिकाणी १० ते २० टक्के कपात

हेही वाचा – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून २८ झाडांचे पुनर्रोपण

एसटीने एक लाख प्रवाशांचा प्रवास

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला या आगारातून कोकणात जाण्यासाठी नियमितसह विशेष बस चालवण्यात आल्या. रायगड, रत्नागिरी या भागात सर्वाधिक बस धावल्या. ५ मे रोजी २४४ नियमित बस चालवण्यात आल्या. तर ८ जादा बस चालवण्यात आल्या. या बसद्वारे ४४,६०० प्रवाशांनी प्रवास केला. ६ मे रोजी २५० नियमित बस आणि ८ जादा बस सोडण्यात आल्या. त्यातून ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला.

2024-05-06T14:49:02Z dg43tfdfdgfd