युरोपाला ‘झळा’

जागतिक तापमानवाढीचे संपूर्ण जगावर परिणाम होत आहेतच; मात्र तापमानवाढीच्या सर्वाधिक झळा बसत आहेत त्या युरोप खंडाला. एका ताज्या अभ्यासाने ही बाब अधोरेखित केली आहे. उर्वरित जगाच्या तुलनेत युरोपातील तापमानवाढ दुप्पट असल्याच्या वास्तवावर या अभ्यासाने बोट ठेवले आहे.

संयुक्त राष्ट्रांची जागतिक हवामान संघटना आणि युरोपीयन युनियनची हवामान संघटना, कोपर्निकस यांनी सादर केलेल्या एका संयुक्त अहवालात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मागील पाच वर्षांच्या तापमानाच्या सरासरीचे विश्लेषण केले असता, युरोपातील तापमानवाढ औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत २.३ अंश सेल्सिअसने अधिक आहे, तर जागतिक पातळीवर ही तापमानवाढ १.३ अंश सेल्सिअस आहे. पॅरिस हवामान परिषदेने तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसच्या आत ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ही बाब येथे लक्षात घ्यायला हवी.

युरोपात २०२३मध्येही तापमान चढेच राहिले, हवामानविषयक टोकाच्या घटना अधिक तीव्र झाल्या. विक्रमी तापमान, वणवे, उष्णतेच्या लाटा, हिमनद्या वितळणे आणि हिमवृष्टीचा अभाव यांची नोंद झाली. सलग दहा महिने विक्रमी सरासरी तापमान नोंदवले गेले, युरोपातील महासागरांच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानाचाही उच्चांक नोंदवला गेला. याचा मानवी आरोग्यावर आणि जीवितावरही परिणाम झाला. वादळे, पूर, वणवे यांत मागील वर्षी दीडशे जणांचे प्राण गेले. या वर्षभरात हवामानाच्या आपत्तींमुळे १३.४ अब्ज युरोंची हानी झाली.

‘युरोपातील हवामानाची परिस्थिती’ या अहवालानुसार या खंडातील एकूण विजेपैकी ४३ टक्के वीज ही पुनर्नवीकरणीय स्रोतांकडून प्राप्त केलेली आहे. त्याआधीच्या वर्षी हे प्रमाण ३६ टक्के होते. मागील दोन वर्षांत युरोपात जैव इंधनापेक्षा नवीकरणीय ऊर्जेचा वापर अधिक असल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे. असे असले, तरी हवामानबदलावर तोडगा म्हणून पारंपरिक ऊर्जेऐवजी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या पुनर्नवीकरणीय ऊर्जेच्या वापराकडे हस्तांतराला वेग देण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने धोरणे आखण्यावर भर द्यावा, अशी शिफारस या अभ्यासाने केली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-02T06:44:02Z dg43tfdfdgfd