शब्दकळा- जांगळबुत्ता

कोणतीही भाषा बोलींच्या दागिन्यांनी मढली असते. ते कोंदण भाषेला अधिकाधिक समृद्ध करते. विदर्भ हा तसा मूळ मध्यप्रांतातील प्रदेश. मागील साठ वर्षांत पूर्व आणि पश्चिम विदर्भ भाषेसह महाराष्ट्राच्या संस्कृतीत बऱ्यापैकी एकरूप झाले. जांगळबुत्ता हा एक रंजक आणि व्यापक वैदर्भीय शब्द आहे. त्याला खूप जुना इतिहास आहे, असे नाही. खेडुतांच्या संवादातून तो पुढे आला असावा. कुणी त्याला जांगडगुत्ताही म्हणतात. जुगाड करून हित साधणे म्हणजे जांगळबुत्ता. म्हटले तर, इप्सित साध्य करण्यासाठी लढविलेली अफलातून शक्कल. या शब्दाला कलारसिकांपर्यंत पोहचविण्याचे बरेचसे श्रेय जाते, मिर्झा रफी अहमद बेग या ग्रामीण प्रतिभावंताला.

विनोदनिर्मिती साधताना खाडकन् भानावर आणण्यात मिर्झा वाकबगार. एका दूरचित्रवाहिनीवरील विनोदी मालिकेत वारंवार उल्लेख करून त्यांनी जांगळबुत्त्याला प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवून दिली. याच नावाने त्यांची लोकप्रिय कविता आणि काव्यसंग्रहही आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे आणि भारत गणेशपुरे यांनीही या शब्दाचा खुबीने उपयोग केला. तो रसिकांना चांगलाच भावला. शक्कल, तोडगा, युक्ती, क्लुप्ती, कल्पना किंवा उपाय अशा समानार्थी शब्दांचा ध्वनित सारांश म्हणजे जांगळबुत्ता. हा झाला सामान्य अर्थ. या सर्वांना सामावून घेत त्यापल्याड उरलेले किंचित डावपेच आणि बरेचकाही कारस्थान असा गर्भित गोषवाराही या शब्दाशी जुळला आहे. फायदा होवो की तोटा, ‘जांगळबुत्ता झाला’ म्हटले की संपले. दोन प्रेमिकांच्या गुजगोष्टी म्हणजे तिसऱ्यासाठी जांगळबुत्ताच.

पेपर कठीण गेला की हमखास जांगळबुत्ता होतो. चिल्लर अभावी परताव्यास दुर्लक्ष केले तर बस वाहकाला प्रवाशाकडून ‘माह्या जांगळबुत्ता कायले करता राजेहो’ अशी तिरकस प्रतिक्रिया येऊ शकते. त्याचा अचूक गाभा शोधायचा झाल्यास ग्रामीण विदर्भाचा दौरा करावा लागेल. “एवढा जांगळबुत्ता कायले करत बसले, मले फोन काऊन नाही केला?” असे उद्गार तुमच्या कानी येतील, त्याक्षणी जांगळबुत्ताच्या कक्षा लोचा, लफडे किंवा झामलझामल करणे इथपर्यंत विस्तारून गेल्या असतील. आता या वैदर्भीय ‘झामलझामल’ ची नेमकी शब्दकळा शोधूया, पुढे केव्हातरी…!

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-27T06:29:47Z dg43tfdfdgfd