सांस्कृतिक धक्के

-मोहन रानडे - फिलाडेल्फिया, अमेरिका

अमेरिकेतील १९८७ सालच्या बीएमएम अधिवेशनातील भाषणात प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी ‘एखादा व्यवहार सर्व समूह करू लागला की बनते ती संस्कृती,’ अशी व्याख्या केली होती. लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यास भारतीयांना चेतविण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी ती प्रथा चालू राहिली आणि मराठी संस्कृती बनली, ती आजतागायत चालू आहे. सध्या त्याचे झालेले त्रासदायक स्वरूप पाहता आज त्याची सार्वजनिक गरज आहे का, हा विचार आता कोणी करीत नाही आणि त्याबद्दल विरोधी विचार मांडला की ती आपली संस्कृती आहे, असा टाहो फोडला जातो.

अमेरिकेतील अनेक प्रथा अशाच संस्कृती म्हणून पाळल्या जातात. या देशाला तर फक्त २५० वर्षांचा इतिहास. त्यामुळे अमेरिकेच्या पुराणात हे लिहून ठेवले आहे, असे कुणी म्हणू शकत नाही, पण जे समाजाला मान्य होऊन आचरणात आले तेच साजरे केले जाते, असे आज दिसते. काही प्रथा तर उद्योजकांनी शोधून काढल्या आहेत. त्याला संस्कृती नाव दिले की त्यांचा माल खपतो, हा त्यातील उद्देश.

अमेरिकेत प्रथम आलो तेव्हा अमेरिकन समाजाला मान्य गोष्टी कोणत्या, हे ध्यानात यायला वेळ लागला आणि त्यामुळे काही वेळा फजिती झाली. पहिल्या वर्षी ऑफिसमध्ये ख्रिसमस पार्टीचे बोलावणे आले. कंपनी लहान होती. आमचा बॉस एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी देणार होता. त्याच्या घरी आधी जमायचे आणि एखादे ड्रिंक घेऊन रेस्टॉरंटला जायचे, असे माझ्या सेक्रेटरीने सांगितले, पण भारतातील प्रथेप्रमाणे ते बोलावणे मला एकट्याला असणार, असे मी समजून चाललो व एकटाच बॉसच्या घरी हजर झालो. तेव्हा सर्वांनी ‘बायको का आली नाही?’ असे विचारताच माझी चूक लक्षात आली. ‘तिची तब्बेत बरी नाही,’ असे म्हणत मी वेळ मारून नेली. स्त्रियांना अशावेळी तरी महत्व दिले जाते, ही अमेरिकेतील संस्कृती. स्त्रियांना मतदान हक्क, पुरुषांइतका पगार यासाठी झगडावे लागले (पगारासाठी आजही झगडावे लागते.) तरी स्त्री-पुरुष समानता संस्कृती इतर क्षेत्रांत अनेक दशके चालू आहे. अमेरिकन लोकांच्या पार्टीत गेलात तर नवरा-बायको सतत एकत्र राहतात, हे माझ्या भारतीय मनाला नेहमी खटकायचे (अजूनही खटकते). आता अमेरिकेतील भारतीय तर त्यापुढे गेले आहेत. भारतीय स्त्री-पुरुष तर एकमेकांशी इतके मोकळेपणाने वागतात की, भारतातून आलेल्या पाहुण्यांनासुद्धा त्याचे आश्चर्य वाटते. त्याउलट भारतास भेट देताना मोठ्या समूहात स्त्रिया एका बाजूला आणि पुरुष त्यांच्या घोळक्यात, असे चित्र आजही दिसते.

अमेरिकेतील लोकांच्या वागण्यात खोटारडेपणा नाही, हे समजायला वेळ लागला. तुम्ही सहज म्हणून ‘जेवायला ये’ असे म्हणालात तर ‘कधी?’ असे विचारून हजर होतील. पण भारतीय प्रथेप्रमाणे ‘बोलावणे रिटर्न करू’ म्हणून त्यांचे बोलावणे येईल, असा विचार स्वप्नातसुद्धा करू नका. तुला बोलवायचे होते, म्हणून मी आलो मला तसे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मला बोलावण्याची जरूर नाही, असा त्यांचा सडेतोड विचार असतो. आता मी बोलावले नाही तर वाईट दिसेल, असे विचार त्यांना शिवत नाहीत.

गेल्या अर्धशतकात अमेरिकेत ख्रिश्चन धर्माची समाजावरची पकड ढिली होत आहे. काही ख्रिश्चन पादरींनी लहान मुलांवर केलेले अत्याचार, धर्म संस्थांत महिलांना महत्त्वाचे स्थान न मिळणे अशी त्याची काही कारणे आहेत. शिकलेला समाज त्यांच्या रोजच्या जीवनात धर्माचे स्थान काय, याचा सांगोपांग विचार करताना दिसतो आणि तो त्यापासून लांब राहतो, असे सध्या चित्र आहे. दक्षिणेतील काही राज्ये फक्त अपवाद आहेत. गर्भपाताला परवानगी का निर्बंध, हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे आणि ख्रिश्चन धर्माचे वर्चस्व असलेल्या राज्यांत हा प्रश्न मतदानाने ठरवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा महिला गर्भपाताचा निर्णय धर्माचा अथवा राजकारण्यांचा नसून स्त्रियांचा वैयक्तिक आहे, असा कौल देतात. येत्या निवडणुकीत याबद्दलचे चित्र अधिक स्पष्ट होईल. गेल्या निवडणुकीत अध्यक्षीय पदासाठी इच्छुक कट्टर ख्रिश्चन विचार असलेले उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत. मतदारांची ही मानसिकता डोनाल्ड ट्रम्प यांनी ओळखून या विषयावर दुटप्पी विधाने करून दोन्ही बाजूंची मते मिळवली. यावरून धर्म हा पुढील निवडणुकीतील ज्वलंत प्रश्न असणार नाही, हे स्पष्ट होते.

त्याउलट अमेरिकेतील भारतीय समाज नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे म्हणा, अथवा अजून विचारात प्रगल्भता न आल्याने हिंदू धर्म म्हणजे त्या धर्माचे सण, देवळे, उपास-तपास असे समजत आहे, असे दिसते. ख्रिश्चन अनुयायी नसल्याने चर्च बंद पडत आहेत, तर अमेरिकेतील प्रत्येक गावी भव्य दिव्य देवळे उभी राहत आहेत. गेल्या २५० वर्षांत अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रत्येक समूहाने सुरुवातीच्या वर्षांत हेच केले. त्यामुळे हिंदू धर्माची ही पताका अमेरिकेत किती शतके टिकेल, हे भविष्यकाळच ठरवेल.

अमेरिकेत येताच मला भारताच्या तुलनेत सर्वांत भिन्नता आढळली ती कुटुंब व्यवस्थेत. माझ्या पिढीने भारतात असताना एकत्र कुटुंब व्यवस्था अनुभवली. येथे येताच सगळेच वेगळे. अमेरिकेतील पहिली पिढी युरोपातून आली असल्याने मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला त्याच्या पायावर उभे राहण्यास सांगायचे, ही युरोपातील प्रथाच अमेरिकेत जोपासली गेली. अमेरिकेत वृद्धापकाळात आई-वडील मासिक उत्पन्नासाठी कोणावरही अवलंबून नसतात. ६५ वर्षांवरील प्रत्येकाला सरकारी पेन्शन मिळते (अगदी आयुष्यात कोणतीही नोकरी न केलेल्या व्यक्तीलासुद्धा) आणि बहुतांशी वैद्यकीय उपचार मोफत असतात. आज भारतात ही परिस्थिती निर्माण केली तर तेथील वृद्धसुद्धा स्वतंत्र राहणे पसंत करतील. भारतातील वृद्धांना हे आर्थिक स्वातंत्र्य नसते अथवा जागांच्या किंमतीमळे मुले स्वतंत्र राहू शकत नाहीत म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीत राहणे अपरिहार्य होते आणि सत्य न सांगता सध्याची एकत्र कुटुंब पद्धती भारतीय संस्कृती म्हणून कौतुक केले जाते.

त्याचा अर्थ अमेरिकेतील मुलामुलींचे त्यांच्या आई-वडिलांवर प्रेम नसते अथवा त्यांची काळजी नसते आणि भारतातील सर्व मुले श्रावण बाळ असतात, असे अजिबात नव्हे. येथील मुले स्वतंत्र राहिली तरी शक्यतो आई-वडिलांपासून फार लांब राहात नाहीत, असेच चित्र दिसते. बहुतेक भारतीय दोन्ही प्रकारच्या कुटुबंव्यवस्था पाहून त्याचा सुवर्णमध्य काढताना दिसतात. मुले १८ वर्षांची होताच त्यांना लगेच वाऱ्यावर सोडले जात नाही, पण त्यांना विचार स्वातंत्र्य देऊन शिक्षणासाठी शक्य असेल तेवढी आर्थिक मदत देऊन त्यांच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावतात. या कारणाने अमेरिकेतील भारतीयांची दुसरी पिढी यशस्वी झालेली दिसते. अमेरिकी कुटुंबे भारतीयांचे अनुकरण करताना आता दिसू लागली आहेत. अमेरिकेत वास्तव्यास येताच या समाजाकडे डोळसपणे पाहून या समाजातील योग्य-अयोग्य याचा समजून विचार पहिल्या भारतीय पिढीने केला, हे त्यांच्या यशाचे गमक आहे. भारतातील मिळालेल्या शिक्षणाने अमेरिकेत आल्यावर ते सूज्ञपणे विचार करू शकले, हे त्याचे रहस्य आहे.

वयाची पहिली तीस वर्षे भारतात काढल्यावर आता गेले अर्धशतक मी अमेरिकेत आहे. आई-वडिलांकडून मिळालेली शिकवण, उत्तम शालेय आणि महाविद्यालयातील शिक्षण यांच्या बळावर दोन भिन्न संस्कृती अनुभवताना त्यांची योग्य सांगड घालण्याचे भाग्य आमच्या पिढीला मिळाले, यापेक्षा अधिक मागणे काय असू शकते?

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T05:50:39Z dg43tfdfdgfd