सप्तपदी हवीच...

‘जे दिसते, ते विकते’ हा बदलत्या काळाचा नवा नियम आहे. ‘हौसेला मोल नाही’ असे आपण नेहमीच म्हणतो, पण त्यापोटी प्रथा आणि परंपरा नाकारणे कुठवर योग्य आहे? अलीकडे लग्नांचेही केवळ उत्सवी सोहळे बनले आहेत. ऐश्वर्याचे प्रदर्शन आणि धांगडधिंगा हा नवा पायंडा चिकटल्याने विवाहसोहळ्यांचे पावित्र्य नाहीसे होत चालल्याची खंत अनेकदा व्यक्त होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने लग्नांकडे बघण्याची नजर बदलण्यास भाग पाडले आहे. ‘केवळ नाचगाणे, खाणेपिणे किंवा देणेघेणे म्हणजे हिंदू विवाह नाही. भारतीय समाजमान्यतेनुसार विवाह हा संस्कार आणि पवित्र बंधन असल्याने त्यात सप्तपदीचे महत्त्व आहे. या ठराविक विधींखेरीज हिंदू विवाहाला मान्यता मिळू शकणार नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लग्नसंस्कारांवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. परिवर्तनशील समाजात पूर्वापार मान्यता बाजूला सारल्या जातात. नवतेचा स्वीकार करण्यावर नव्या पिढीचा भर असतो. अशा वेळी विधी, रीती-रिवाजांपेक्षा उत्सवी स्वरूपाकडेच अधिक लक्ष दिले जाते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने एका प्रकरणावर निकाल देताना नेमकेच रिवाजांच्या महत्त्वावर बोट ठेवले. विधींशिवाय केवळ सोबत राहण्याला हिंदू विवाह अधिनियमांची मान्यता देऊ पाहणाऱ्यांची न्यायालयाने कानउघाडणीही केली. ‘सप्तपदी’खेरीज झालेल्या लग्नाला हिंदू विवाह म्हणता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती देतानाच सर्वोच्च न्यायालयाने १९५५च्या हिंदू विवाह अधिनियमातील हिंदू विवाहाच्या व्याख्येकडे लक्ष वेधले.

सप्तपदीखेरीजचा विवाह अमान्य असल्याचे त्यात नोंदविले आहे. हिंदू विवाह अधिनियमानुसार दोन हिंदूंमधील विवाहाला काही अटींखेरीज मान्यता लाभत नाही. विवाहाच्यावेळी वराची पत्नी वा वधूचा पती हयात नसावा. कायदेशीर सहमती असली तरी विवाह आणि अपत्यप्राप्तीत अडचणीचा ठरणारा मानसिक विकार दोघांनाही नसावा. वराने वयाची २१ आणि वधूने १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत. विवाह दोन्ही पक्षांच्या प्रथा, परंपरेनुसार घडवून आणलेला असावा. अलाहबाद उच्च न्यायालयानेसुद्धा मागे सप्तपदीचे महत्त्व एका निकालात अधोरेखित केले होते. लग्नविधी कोणताही असला तरी फक्त वर-वधूंचे नव्हे तर दोन कुटुंबाचे मनोमिलन म्हणजे लग्न हा निकष मात्र विसरता कामा नये. थोडक्यात, सर्वोच्च न्यायालयालाही मानवी जीवनातील या महत्त्वाच्या विधीमध्ये गांभीर्य अपेक्षित आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T06:27:57Z dg43tfdfdgfd