मंगळावर आढळले गूढ विवर

कॅलिफोर्निया : आपल्या सूर्यमालेतला चौथा ग्रह असलेला मंगळ आजवर नेहमीच कुतुहलाचा विषय ठरलेला आहे. स्पेसएक्सचे अब्जाधीश संस्थापक एलॉन मस्क हे तर मंगळावर जीवसृष्टी वसविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशिवाय जगभरातील अनेक खगोलशास्त्रज्ञ मंगळावर मानवी वस्तीसाठी कोणत्या गोष्टी अनुकूल आहेत याचा शोध घेत आले आहेत. यादरम्यान मंगळावर एक गूढ विवर दिसले आहे.

प्राचीन ज्वालामुखीच्या शेजारी दिसणार्‍या या गूढ विवरामुळे अंतराळाबाबत कुतूहल असलेल्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे. असे म्हटले जाते की, मंगळावर धुळीची वादळे आणि तापमानातले चढ-उतार या गोष्टी सर्वसाधारण आहेत; मात्र आता हा मोठा खड्डा कसा पडला, असा प्रश्न शास्त्रज्ञांसमोर आहे.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) मार्स रिकॉनिसेंस ऑर्बिटरवर लावलेल्या हाय-रिझोल्युशन इमेजिंग सायन्स एक्स्परिमेंट कॅमेर्‍याने हे विवर टिपले आहे. एका नामशेष झालेल्या अर्सिया मॉन्स नावाच्या ज्वालामुखीच्या काठावर हे विवर आहे. ऑगस्ट 2022 मध्ये अर्सिया मॉन्स ज्वालामुखीचा शोध लागला होता. ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या लाव्हारसामुळे मोठ्या घळी तयार होणे किंवा ज्वालामुखीच्या जवळपास खड्डे दिसणे ही सामान्य बाब आहे. पण, या कॅमेर्‍याने टिपलेले विवर थोडे वेगळे असल्याचे म्हटले जात आहे. हे विवर नेमके कशामुळे तयार झाले, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.

शास्त्रज्ञांचा असा समज आहे, की हे विवर एखाद्या किंवा अनेक गुहांकडे जाणारा मार्ग असू शकतो. मंगळ ग्रह हा पृथ्वी आणि आपल्या चंद्रासारखा निघाला, तर अशा विस्तीर्ण घळी मानवी वसाहतींना आश्रय देऊ शकतात. या घळींना ‘स्कायलाइटस्’ म्हणतात. भविष्यात मानव मंगळावर गेला, तर या घळी आणि विवरांमध्ये त्यांची वस्ती स्थापन होऊ शकते. नासाने एका विवराचा फोटो प्रसिद्ध केला आहे. त्याची एका बाजूची भिंत दिसत आहे. यावरून लक्षात येते, की ते विवर दंडगोलाकार आहे आणि बहुधा ते कोणत्याही गुहेकडे जात नाही. अशा खड्ड्यांना ‘पिट क्रेटर्स’ म्हणतात.

हवाईयन ज्वालामुखींजवळ असे अनेक क्रेटर्स आढळतात. पृथ्वीवरचे पिट क्रेटर्स 6 ते 186 मीटर खोल आहेत. मंगळावरील अर्सिया मॉन्स ज्वालामुखीचे विवर 178 मीटर खोल आहे. असे खड्डे शास्त्रज्ञांना आकर्षित करतात. कारण, ते मंगळावरील भूतकाळातील जीवनाचे संकेत देऊ शकतात. त्या ग्रहावर सूक्ष्मजीवांचे जीवन अजूनही अस्तित्वात आहे की, नाही हे ठरविण्यातही ते मदत करू शकतात.

2024-06-11T05:05:48Z dg43tfdfdgfd