रस्ते अपघातांचे आव्हान

विनिता शाह

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भाविकांनी भरलेली बस कोसळून 22 जणांचा मृत्यू झाला, तर 57 जण जखमी झाले. ही बस 150 फूट खोल खड्ड्यात पडल्याने मदतकार्यात अडथळे आले. इतक्या उंचावरून बस पडल्यामुळे प्रवाशांना प्रचंड वेदना आणि त्रास सोसावा लागला. जम्मू-काश्मीरमध्ये सासत्याने बस अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. अशा अपघातात निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या रोज समोर येत आहेत.

अलीकडील काळात अपघाताविषयीचे गांभीर्य किंवा संवेदनशीलता कमी होत चालली आहे की काय, असा प्रश्न पडतो. ताज्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील हाथरस येथून भरधाव वेगात मोटार वाचवण्याच्या प्रयत्नात बसचे नियंत्रण सुटले आणि ती खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले की, चालकाला झोप लागली आहे. अशा मोठ्या अपघातांच्या मुळाशी मानवी निष्काळजीपणाच आहे, यात शंका नाही. सपाट भागातून अवघड डोंगर मार्गावर बसेस नेणार्‍या चालकांना डोंगरी मार्गावर बस चालवण्याचा पुरेसा अनुभव असतो का, याचे आकलन केले जात नाही. तीक्ष्ण वळणांवर वाहन नियंत्रित करण्याचा सराव आणि कौशल्य नसल्याने असे अपघात घडतात. जटिल भौगोलिक परिस्थितीमुळे डोंगराळ भागात होणार्‍या अपघातांमध्ये मानवी हानी जास्त असते. मोठी दुर्घटना घडल्यानंतर शासन व प्रशासनाकडून नुकसानभरपाई व शोकसंदेश जाहीर केले जातात; मात्र अपघातांच्या कारणांचा शोध घेतला जात नाही. अपघातांमागील खरी कारणे सार्वजनिक चर्चेत आली, तर त्यातून शिकून शेकडो जीव वाचवता येतील. देशात दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, ही दुर्दैवाची बाब आहे. या अपघातांमध्ये सुमारे साडेचार लाख लोक जखमी होतात. यातील अनेकजण आयुष्यभरासाठी अपंग होतात.

दरवर्षी रस्ते अपघातात होणार्‍या मृत्यूंच्या संख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो; मात्र असे असतानाही नाहक मरणार्‍या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी संपूर्ण देशातील धोरणकर्त्यांकडून कोणताही प्रामाणिक पुढाकार दिसत नाही. अलीकडच्या वर्षांत राष्ट्रीय महामार्गांचा देशभर विस्तार झाला आहे. रस्ते रुंद आणि सोयीचे झाले; पण वाढता वेग जीवघेणा ठरत आहे. काही ठिकाणी रस्ते बांधणी तंत्रज्ञानातील त्रुटी अपघातांचे कारण बनल्याच्या तक्रारी आहेत.

अनियंत्रित वेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि दारूच्या नशेत वाहन चालवणे यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अपघातांच्या कारणांबाबत तपशिलात गेलो तर ड्रायव्हिंगचा अनुभव न घेता ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवणे आणि ट्रकचालकांची नियमित नेत्र तपासणी न करणे हे प्रकारही समोर येतात. खरे तर वाहनांची फिटनेस चाचणी, सार्वजनिक वाहनचालकांचे आरोग्य याची नियमित तपासणी व्हायला हवी आणि वाहन चालवण्याचा कालावधी विहित वेळेसाठीच निश्चित केला पाहिजे. चालकाला पुरेशी झोप न मिळाल्याने आणि पुरेशी विश्रांती न मिळाल्याने अपघात झाल्याचे अनेक सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले आहे.

रात्रीच्या वेळी प्रवास करणे हे लोक सोयीचे मानू लागले आहेत, हीदेखील चिंतेची बाब आहे. रात्रीच्या वेळी वाहन चालवणे अनेक प्रकारे असुरक्षित असते आणि अपघातानंतर पुरेशी मदत आणि उपचार न मिळाल्याने प्राणघातक ठरू शकते. या अपघातांची दु:खद बाब म्हणजे मृतांमध्ये बहुतांश तरुण आणि कुटुंबातील कमावते सदस्य आहेत. अशा तरुणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाला आर्थिक फटका बसतो. हे देशाचे मोठे आर्थिक नुकसान आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालाने पुष्टी केली आहे की, भारतात दरवर्षी रस्ते अपघातात मरणार्‍यांची संख्या थांबवता आली तर देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन तीन टक्क्यांपर्यंत वाढू शकते. जगातील इतर देशांच्या तुलनेत वाहने कमी असूनही भारतात रस्ते अपघात इतक्या मोठ्या प्रमाणात का होतात, याचाही धोरणकर्त्यांना विचार करावा लागेल.

2024-06-11T05:20:52Z dg43tfdfdgfd