BEED ATM MACHINE THEFT: मोदींच्या सभास्थळाजवळून एटीएम मशीन चोरीला, बीडमधील धक्कादायक प्रकार

सुकेशनी नाईकवाडे, प्रतिनिधी बीडBeed ATM Machine Theft: बीडच्या अंबाजोगाई शहरात मागच्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र आहे. असे असताना आता तर चोरटयांनी थेट एटीएम मशीनच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांने हे एटीएम मशीन लंपास केल्यानंतर रविवारी सकाळी ही घटना समोर आली आहे.

विशेष म्हणजे शहारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून या सभेच्या ठिकाणापासून अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर ही घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने शहरात आणि या संपूर्ण परिसरात कालपासून मोठा पोलीस बंदोबस्त आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असताना चोरट्यानी एटीएम मशीन लांबवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

बीडच्या अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात ‘इंडिया 1’ कंपनीचे खाजगी ‘एटीएम’ आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या ‘एटीएम’ वर दरोडा घालत चक्क ‘एटीएम’ मशीनचं लंपास केले. दरम्यान या ‘एटीएम’मध्ये संबंधित बॅंकेची किती कॅश होती? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान अंबाजोगाई शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.

याआधी देखील बीडमध्ये एटीएम चोरीची घटना

याआधी देखील बीडमधील एटीएम चोरण्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये बीडच्या येलंबघाट परिसरात असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दोन जण चोरीच्या उद्देशाने घुसले. पारंपरिक तंत्र बाजूला ठेवून त्यांनी आपली कार बीडच्या एटीएममध्ये नेली. परंतु स्थानिक पोलिसांना एटीएममध्ये बसवलेल्या सुरक्षा सेवांकडून माहिती मिळाल्याने ते तात्काळ दाखल झाले. परंतु पोलिस घटनास्थळी पोहोचल्याचे पाहून चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

2024-05-05T09:14:09Z dg43tfdfdgfd