GANESH RUDRAKSHA BENEFITS FOR STUDENTS: विद्यार्थ्यांसाठी फलदायी गणेश रुद्राक्ष,कधी आणि कसे धारण करावे जाणून घ्या

Ganesh Rudraksha Benefits For Students: परीक्षेच्या काळात अनेकदा विद्यार्थ्यांना पाठांतर केलेल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. त्यामुळे त्यांना परीक्षेतल्या अनेक प्रश्नांची नीट उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळे त्यांना कमी गुण मिळतात. अशा वेळी बुध ग्रहाची अनुकूलता आणि गणेश रुद्राक्ष धारण करुन बौद्धिक क्षमतांचा विकास करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रज्ञ देतात.

एकमुखी रुद्राक्षापासून चौदा मुखांच्या रुद्राक्षापर्यंत रुद्राक्षाचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. गौरीशंकर रुद्राक्ष तसेच गणेश रुद्राक्ष हे रुद्राक्षाचे दुर्मिळ प्रकार आहेत. आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण केलेल्या कर्माच उत्तम फळ मिळावे म्हणून अभिमंत्रित करुन हे रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला ज्योतिषांकडून दिला जातो. परीक्षा जवळ आल्यावर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळतील की नाही, अभ्यास नीट होईल की नाही, अशा चिंता सतावू लागतात. त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय सांगण्यात आला आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार,अभ्यासात यश मिळण्यासाठी बुध ग्रह अनुकूल असणे आवश्यक आहे. बुध ग्रह जर अनुकूल असेल तर व्यक्ती बुद्धिमान होते. त्याला त्याच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळते.

बौद्धिक विकासासाठी उपयुक्त गणेश रुद्राक्ष

मंत्र -जप, अनुष्ठान, औषधी स्नान आणि रत्न धारण करुन बुध ग्रह अनुकूल होतो, असे म्हटले जाते. पण विद्यार्थ्यांनी बौद्धिक विकास आणि अभ्यासात यश मिळावे, यासाठी गणेश रुद्राक्ष बुधवारी धारण करावे. त्यामुळे त्याचे अधिक चांगले फळ प्राप्त होते. गणेश रुद्राक्षामुळे बुधाच्या कृपेसोबतच अभ्यासात मन एकाग्र होते. स्मरणशक्ती वाढते. तसेच लेखनासाठीही प्रेरणा मिळते. याच्या प्रभावामुळे सामान्य विद्यार्थ्यालाही चांगला लाभ होतो.

गणेश रुद्राक्ष कधी असे कसे धारण करावे ?

गणेश रुद्राक्ष धारण करण्याआधी गाईचे कच्चे दूध आणि गंगाजलाने ते धुवून घ्यावे. त्यानंतर त्याचे पूजन करावे. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. गणेश रुद्राक्ष हिरव्या रंगाच्या धाग्यामध्ये धारण करावे. शुक्ल पक्षात बुधवारी सर्वार्थसिद्धी योग असताना गणेश रुद्राक्ष धारण करणे अधिक शुभ मानले जाते.

गणेश रुद्राक्षामुळे होणारे इतर लाभ

गणेश रुद्राक्षाचा संबंध गणपतीसोबत आहे. अभ्यासात प्रगती करण्यासाठी उपयुक्त या रुद्राक्षामुळे आणखी काही लाभदेखील होतात. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक गोष्टीमध्ये निपुणतेसाठी गणेश रुद्राक्ष धारण करता येईल. मुलीच्या लग्नात येणारे अडथळे गणेश रुद्राक्षामुळे दूर होतात. संतान प्राप्तीसाठी गणेश रुद्राक्ष महाशिवरात्री किंवा मासिक शिवरात्रीच्या दिवशी धारण करणे फलदायी असते. गणेश रुद्राक्ष धारण केल्यामुळे संतान बाधा, मुलांच्या लग्नामध्ये येणारे अडथळे दूर होतात.

(Disclaimer - या लेखामध्ये दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. या माहितीविषयी आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणत्याही समस्यांसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

2024-05-02T09:11:27Z dg43tfdfdgfd