GOA NEWS : बेपत्ता बाशुदेवचे नेमके काय झाले?

दीपक जाधव

पणजी : सांतइस्तेव बेटावर असलेल्या आखाडा फेरी धक्क्यावर घडलेल्या अपघाताचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. पोलिस सर्व शक्यता पडताळून तपास करीत असले, तरी या कारमधून बेपत्ता झालेल्या बाशुदेव भंडारी याची कोणतीही माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. त्यातच चौकशीला पाचारण केलेल्या त्याच्या मैत्रिणीने आपण 23 सप्टेंबरपर्यंत गोव्यात येऊ शकत नसल्याचे पोलिसांना कळविले आहे. तिच्या सखोल चौकशीनंतरच यातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाशुदेवचे पुढे नेमके काय झाले, त्याचा शोध घेणे यावरच लक्ष केंद्रित करून तपास सुरू असल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

साखळी येथे व्यवस्थापनशास्त्र संस्थेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या मैत्रिणीसोबत प्रेमाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाशुदेव हा अहमदाबाद येथून गोव्यात आला होता. 31 ऑगस्टच्या रात्री आपल्या मित्रांसोबत त्या दोघांनी जेवणही केले होते.

सांतइस्तेव बेटावरील आखाडा फेरी धक्क्यावर बाशुदेवची कार नदीत गेल्यानंतर तो बेपत्ता झाला आहे. ही घटना 31 ऑगस्ट रोजी रात्री घटली होती. या अपघातातून वाचलेल्या मैत्रिणीने ही घटना स्थानिकांना सांगितली होती. बाशुदेव चालवत असलेल्या कारने दुसर्‍या कारला धडक दिल्यानंतर त्या कारने पाठलाग केला. त्यांच्यापासून वाचण्यासाठी बाशुदेवने भरधाव वेगाने कार धक्क्यावर आणली. मात्र, त्याचा अंदाज चुकल्याने कार थेट नदीच्या पाण्यात शिरली. आपण बाहेर आले; मात्र बाशुदेवला पोहता येत नसल्याने तो कारमध्येच अडकला, असा पहिला जबाब त्याच्या मैत्रिणीने पोलिसांना दिला आहे. त्यानंतर बाशुदेवचा भाऊ बलराम भंडारी याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सदर कारसह बेळगावमधील संशयित यासिम गौस (32) व सलमान ऊर्फ मोहम्मद गौस (28) यांना ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळाली नाही. दरम्यान, नदीत बेपत्ता झालेल्या बाशुदेवचा शोध घेण्यासाठी किनारी पोलिस, अग्निशमन दल तसेच नौदलाने देखील मोहिमा राबविल्या. मात्र, त्याचा शोध 18 व्या दिवशीही लागलेला नाही. त्यामुळे बाशुदेव जिवंत असल्याच्या संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची दिशा फिरवली आहे.

ChatGPT डाउन! अनेक यूजर्संच्या तक्रारी, OpenAI ने सांगितले कारण

फोन कोणी उचलला?

बाशुदेवच्या मोबाईलवर 4 सप्टेंबर रोजी कॉल केले असता 4 सेकंद तसेच 35 सेकंदासाठी कुणीतरी फोन उचलला होता असे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बासुदेव जर 31 ऑगस्टपासून बेपत्ता आहे, तर मग त्याचा फोन कोणी उचलला याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून त्याचा मोबाईल नेमका कोणाकडे होता व त्याने बासुदेवच्या वडिलांशी का संवाद केला नाही, या प्रश्नांची उत्तरेही पोलिसांना शोधावी लागतील.

बँक व्यवहारांवर लक्ष

प्रेमाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाशुदेव हा येताना 1 लाख रुपये घेऊन आला होता. त्या दिवशीचा पार्टीचा खर्च झाल्यानंतरही त्याच्याकडे किमान 50 हजार रुपये शिल्लक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यासोबत दोन डेबिट आणि दोन क्रेडिट कार्डस्ही आहेत. मात्र, या कार्डस्चा अद्याप वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याच्या बँक व्यवहारांवरही लक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • 23 सप्टेंबरनंतर होणार मैत्रिणीची चौकशी

  • बाशुदेव कारमध्ये नसल्याचा पोलिसांना संशय

  • बासुदेव नदीतून बाहेर येतानाचेही फुटेज नाही

"ओम नमः शिवाय जप ते हनुमान चालीसा" : ...जेव्‍हा विराट-गंभीर आमने-सामने येतात

2024-09-18T11:22:03Z dg43tfdfdgfd