KOLHAPUR POLITICAL NEWS | विधानसभा निवडणुकीत बंडखोरी अटळ!

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : ऑक्टोबरमध्ये होणार म्हणून गाजत असलेली विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार, असे चित्र आहे. अपेक्षित वेळेपेक्षा नियोजित वेळेत निवडणूक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आता पक्ष नेते आणि इच्छुकांना भरपूर वेळ मिळाला आहे. उमेदवारीसाठी दबावतंत्र दोन्ही बाजूंनी सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपावरून ताणाताणी आहे. दोन्हीकडे आतापासूनच पक्षांतर्गत दबावतंत्र सुरू असतानाच आता महायुतीच्या घटक पक्षांनी आपल्या जागा मागणीच्या तलवारी उपसल्या आहेत. त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी असो, दोन्हीकडे बंडखोरीची लागण होणार हे निश्चित असल्याने नेत्यांना त्यांची भीती आहे. दरम्यान, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा हे लवकरच कोल्हापूर दौर्‍यावर येण्याची शक्यता असून, त्यांच्या या दौर्‍यापासूनच विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे, तर भाजपला निवडणुकीपूर्वीच गळती लागली आहे. शरद पवार यांच्या सभेने महाविकास आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या 10 जागा आहेत. त्यापैकी चार जागा काँग्रेसकडे, एक जागा शिंदे शिवसेनेकडे, एक अपक्ष शिंदे शिवसेनेकडे, ताराराणी पक्षाचे व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रत्येकी एक आमदार भाजपचे सहयोगी, तर दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी राजकीय परिस्थिती आहे.

भाजप नेत्यांसाठी लाल गालिचा

कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा येणार आहेत. या महिन्यात हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. या कार्यक्रमात शहा हे विधानसभेसाठी महायुतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या जिल्ह्याची आर्थिक नाडी समजल्या जाणार्‍या संस्थेत पहिल्यांदाच भाजपच्या नेत्यांसाठी लाल गालीचा अंथरला जाणार आहे.

उत्तरमध्ये आघाडी व युतीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त

कोल्हापूर उत्तरमध्ये विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागेल. मालोजीराजे, मधुरिमाराजे, सचिन चव्हाण आदी काँग्रेसमधून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाला व्ही. बी. पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ हवा आहे. गेल्या वेळी पोटनिवडणुकीत काँग्रेसला जागा दिली. आता शिवसेना ठाकरे गटाला जागा द्यावीच लागेल असे ठाकरे शिवसेनेचे म्हणणे आहे. संजय पवार त्यासाठी इच्छुक आहेत. पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार रिंगणात होता. यामुळे भाजपचा झेंडा फडकाविण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. त्यामध्ये कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव ही नावे आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर इच्छुक आहेत. ते जोरदार तयारी करीत आहेत.

दक्षिण पाटील विरुद्ध महाडिक

दक्षिणला पाटील विरुद्ध महाडिक असा पारंपारिक संघर्ष आहे. उमेदवारी आणि पक्ष तेथे गौण आहेत. दोन घराण्यातील संघर्षात उमेदवार कोण हे पाहणे महत्त्वाचे आहे. काँग्रेसचे ऋतुराज पाटील विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरुद्ध कृष्णराज महाडिक की अमल महाडिक हे अद्याप ठरलेले नाही.

करवीरला तिरंगी लढत

करवीरमध्ये पाटील विरुद्ध नरके हा सामना आहेच. त्याचबरोबर आता पूर्वीच्या पन्हाळा व गगनबावडा मतदारसंघातील गावांच्या आधारावर जनसुराज्यने येथून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. पी. एन. पाटील यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना काँग्रेसचे उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेचे चंद्रदीप नरके व जनसुराज्यचे संताजी घोरपडे उमेदवार असतील.

कागलची लढत काटाजोड

कागलमधून इच्छुक असलेले शाहू सहकार समूहाचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हसन मुश्रीफ महायुतीचा घटक झाले तेव्हाच आपला आणि महायुतीचा संबंध संपला हेही त्यांनी जाहीर केले. 1999 पासून कागलचे आमदार असलेले हसन मुश्रीफ यांच्यासमोर कडवे आव्हान उभारले आहे. यापूर्वी त्यांचे आणि सदाशिवराव मंडलिक यांचे मतभेद झाल्यानंतर मंडलिक यांनी आपला मुलगा संजय यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरविले होते. ते आव्हान मुश्रीफ यांनी परतावून लावले होते. आता समरजित घाटगे यांच्या रुपाने त्यांच्यासमोर शरद पवार यांनी उभे केलेले आव्हान ते कसे परतवणार हे पहावे लागेल. मुश्रीफ यांना माजी आमदार संजय घाटगे यांनी पाठिंबा दिला आहे. माजी खासदार संजय मंडलिक हे महायुतीचे घटक आहेत. त्यामुळे बदलत्या राजकारणात या दोन्ही गटाच्या मतांवर मुश्रीफ यांची भिस्त असेल. अलिकडेच त्यांनी संजय मंडलिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

राधानगरीत इच्छुकांची मांदियाळी

राधानगरीत उमेदवारांची संख्या एवढी आहे की तेथे बंडखोरी अटळ आहे. बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील हे दोघेही महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. ए. वाय. पाटील यांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाशी जुळवून घेतले. के. पी. पाटीलही काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू असतानाच अचानकपणे के. पी. पाटील यांनी नवा डाव टाकला आणि शिवसेना ठाकरे गटात प्रवेशाची तयारी केली. ही जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. सत्यजित जाधव व राजेंद्र मोरे हेही काँग्रेसकडून इच्छुक आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडून प्रकाश पाटील व सुरेश चौगुले इच्छुक आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक आहेत. के. पी.पाटील, ए. वाय. पाटील, राहुल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली. के. पी. पाटील यांनी आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असल्याचे आवर्जून सांगितले.

चंदगडला सर्वाधिक इच्छुक

चंदगडला स्वघोषित उमेदवार सर्वाधिक आहेत. त्यांनी उमेदवारी जाहीर करताना लढणार नक्की पण पक्ष नंतर सांगू असे म्हणत प्रचार सुरू केला आहे. विद्यमान आमदार अजित पवार राष्ट्रवादीचे राजेश पाटील हे आहेत. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून विनायक पाटील, विद्याधर गुरबे, गोपाळराव पाटील, जनता दलाकडून स्वाती कोरी, शरद पवार राष्ट्रवादीकडून नंदा बाभूळकर, अमर चव्हाण तसेच मानसिंग खोराटे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून रियाज शमनजी, सुनील शिंत्रे व प्रभाकर खांडेकर हे इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून अनिरुद्ध रेडेकर, भाजपकडून शिवाजीराव पाटील व संग्राम कुपेकर यांची नावे चर्चेत आहेत. तेथे आणखी उमेदवार येऊ शकतात. स्वाती कोरी यांनी मेळावा घेऊन लढण्याचे संकेत दिले आहेत.

शाहूवाडीत लढत दुरंगी की तिरंगी

शाहूवाडीत विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार असून ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर, काँग्रेसकडून रणवीर गायकवाड इच्छुक आहेत. येथे महाविकासची उमेदवारी कोणाला मिळणार हे पहावे लागेल. खासदार धैर्यशिल माने यांच्या विजयात कोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सत्यजित पाटील सरुडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

शिरोळमध्ये उमेदवार ऐनवेळी ठरणार

शिरोळमध्ये इच्छुक उमेदवार भरपूर आहेत. विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले. मूळ शिवसेनेतून शिंदे शिवसेनेकडे गेले. येथे शिवसेना ठाकरे गटाकडून उल्हास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी किंवा सावकर मादनाईक, काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांची चर्चा आहे. भाजपकडून माधवराव घाटगे यांच्या नावाची चर्चा आहे तसेच मयूरचे संजय पाटील इच्छुक आहेत. येथे वंचितची ताकद असून त्यांचाही उमेदवार रिंगणात असेल.

इचलकरंजीत महायुतीत उमेदवारीसाठी चुरस

इचलकरंजीतून अपक्ष आमदार ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे हे भाजपचे सहयोगी आमदार आहेत. कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे यांच्यानंतर आता आवाडे घराण्याने तिसर्‍या उमेदवाराची म्हणजेच राहुल आवाडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तेथे महाविकास आघाडीअंतर्गत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मदन कारंडे तर काँग्रेसकडून संजय कांबळे व राहुल खंजिरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शरद पवार राष्ट्रवादीकडून माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे चिरंजीव सुहास जांभळे इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख रवींद्र माने इच्छुक आहेत. भाजपकडून माजी आमदार सुरेश हाळवणकर मोर्चेबांधणी करीत आहेत तर आवाडे यांनी उमेदवारीसाठी आपण कोणाच्या दारात जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. राहुल आवाडे हे शिंदे शिवसेनेतून उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा आहे.

हातकणंगलेत आघाडी पेचात

हातकणंगले मतदारसंघातून काँग्रेसचे राजूबाबा आवळे हे विद्यमान आमदार आहेत. तेथे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर तयारी करीत आहेत. भाजपकडून डॉ. अशोकराव माने इच्छुक आहेत. येथे वंचित व अन्य उमेदवारांच्या नावाची भरपूर चर्चा असली तरी अद्याप नावे निश्चित करण्यात आलेली नाहीत. ताराराणी पक्षाकडून किरण कांबळे तर स्वाभिमानी पक्षाकडून जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे इच्छुक आहेत. येथे वंचितचा उमेदवारही रिंगणात असेल. डॉ. सुजित मिणचेकर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार आहेत.

यांची पाटी कोरीच

जिल्ह्यात भाजप, शरद पवार राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाची विधानसभेत पाटी कोरीच आहे. या ठिकाणी स्थान मिळविण्यासाठी या तीन पक्षांच्या नेत्यांना कडवा संघर्ष करावा लागणार आहे. एकेकाळी कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे पाच आमदार, त्यापैकी तीन मंत्री, शिवसेनेचे सहा आमदार, तर भाजपचे दोन आमदार असे संख्याबळ होते. आता पक्षाला पुन्हा वैभव मिळवून देण्याची जबाबदारी नेत्यांची आहे.

2024-09-07T06:10:42Z dg43tfdfdgfd