NAGAR : कोल्हार खुर्द सोसायटीत सत्तांतर..!

कोल्हार खुर्द विकास सोसायटीच्या झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी नाट्यमय घडामोडीनंतर अखेर सत्तांतर झाले. यावेळी विखेंच्या दोन गटात दुफळी होऊन महेश पाटील यांच्या नेतृत्वात अध्यक्ष पदी बाबासाहेब लोंढे व तर उपाध्यक्ष म्हणून संजय भोसले हे विजयी झाले. कोल्हार खुर्द सोसायटी निवडणूक अडीच वर्षांपूर्वी होऊन त्या ठिकाणी तनपुरे समर्थक अनिल शिरसाठ यांची 13 पैकी 7 संचालक निवडून येऊन सत्ता आली आणि विखे गटाला सहा संचालक घेऊन विरोधात बसावे लागले होते. परंतु अनिल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील या संचालक मंडळात अंतर्गत मतभेद होऊन तीन संचालक फुटून दिगंबर शिरसाठ यांच्या विखे गटाबरोबर गेले, त्यामुळे सत्ताधारी अल्पमतात आल्याने त्यांच्यावर अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू झाल्या.

परंतु अविश्वास ठराव दाखल होण्यापूर्वीच अध्यक्ष, उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने अविश्वास ठराव मांडला जाऊ शकला नाही.अध्यक्ष, उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने नवीन निवडीची सभा काल रविवारी दि.15 रोजी झाली.परंतु या ठिकाणी पुन्हा नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला.

दिगंबर शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील विखे गटाने राहुरी कारखान्याचे संचालक तथा विखे गटाचेच महेश पाटील यांना विचारात न घेतल्याने त्यांनी भाऊसाहेब लोंढे यांच्या विखे गटाबरोबर जाऊन संस्थेवर विखे गटाची सत्ता आणायची असा प्रयत्न सुरू केला. महेश पाटील यांनी नेतृत्व करून दिगंबर शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील विखे गटाचे दोन संचालक गळाला लावून बहुमत तयार केले.

रविवारी सकाळी निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दिगंबर शिरसाठ यांच्या गटाकडून रंगनाथ घोगरे यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षासाठी प्रकाश चिखले यांनी अर्ज भरले तर महेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील विखे गटाकडून बाबासाहेब लोंढे व संजय भोसले यांनी अर्ज भरले.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन मतदान झाल्यानंतर महेश पाटील, भाऊसाहेब लोंढे, रामनाथ शिरसाठ, प्रकाश शिरसाठ, मच्छींद्र जाधव, बबन शिरसाठ यांचे नेतृत्वाखालील जनसेवा विकास मंडळाचा विजय झाला. यामध्ये बाबासाहेब लोंढे अध्यक्ष व संजय भोसले उपाध्यक्ष सात विरुद्ध सहा मतांनी विजयी झाले.

कोल्हार खुर्दच्या राजकारणात अनेकवेळा ट्विस्ट वर ट्विस्ट होत असल्याने येथील राजकारण हे कायम चर्चेत राहिले आहे. मागील दोन महिन्यापूर्वीचीच पुनरावृत्ती काल पुन्हा पाहायला मिळाली. निवड झालेल्या नूतन पदाधिकार्‍यांचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

‘तनपुरे’ गटाने केला खेला?

तनपुरे गटाचे अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या चार संचालकांनी अचानकपणे महेश पाटील यांच्या गटाला पाठिंबा दिल्याने सोसायटीत सत्तांतर झाले असून या राजकीय बेरीज वजाबाकीची परिसरात जोरदार चर्चा चालू असून या राजकारणाचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे दिसते.

2024-09-16T10:06:27Z dg43tfdfdgfd