PUNE ZIKA VIRUS: चिंता वाढली! पुण्यात झिकाने घेतला दोघांचा बळी

Pune Zika Virus: सध्या पुराच्या संकटात सापडलेल्या पुणेकारांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पुण्यात झिका व्हयरसचे संकट गडद झाले आहे. या ठिकाणी झिका व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये 76 आणि 72 वर्षीय दोन वृद्धांचा समावेश आहे. दोघांना झिकाची लागण झाली होती, असे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसात पुण्यात झिका रुग्णाची वाढती संख्या त्यात दोघांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

झिका व्हायरसने सध्या राज्याची चिंता वाढवली आहे. त्यात पुण्यात झिका बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला शहरी भाग आणि आता ग्रामीण भागापर्यंत पसरलेला झिका व्हायरस पुणेकारांची चिंता वाढवणारा आहे. या व्हायरसचा गर्भवती महिला आणि वृद्धांना सर्वाधिक धोका निर्माण आहे. अशात या विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पुणे महापालिका आरोग्य विभागाकडू मिळालेल्या माहितीनुसार, मृत दोघांपैकी एक वृद्ध हा वारजे येथील असून त्याला 10 जुलै रोजी जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना 14 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. मृताचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले असता त्याचा अहवाल प्राप्त होत या रुग्णाला झिका विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. तर दुसरा मयत हा खराडी येथील असून या वृद्ध रुग्णाला 18 जुलै रोजी शास्त्रीनगर येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाचे नमुने 22 जुलै रोजी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते आणि 23 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार मयताला झिका विषाणूची लागण झाली होती.

झिका बाधितांची संख्या 37 वर

दरम्यान, शुक्रवारी प्रभात रोड येथील एका 72 वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याने समोर आले आहे. या महिलेला 15 जुलैपासून ताप आणि सूज अशी लक्षणे जाणवत होती. त्यानुसार या महिलेचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल प्राप्त होत महिलेला झिकाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, आता एकूण रुग्णसंख्या 37 वर पोहचली आहे. पुण्यात झिका रुग्ण संख्येत होणारी ही वाढ लक्षात घेता प्रशासनाकडून संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी केली जात आहे. तसेच लक्षणे दिसल्यास नागरिकांनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील प्राशासनातर्फे कराण्यात आले आहे.

2024-07-27T08:27:23Z dg43tfdfdgfd