RAJ THACKERAY : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा लगावला. अडीच अडीच वर्ष जर केली असती तर आज जे बोलताय ते बोलला असता का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. तसेच कोकणातील जैतापूर आणि नाणार प्रकल्पावरून देखील राज ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. तर त्यावेळी राज ठाकरेंनी नारायण राणे यांचं कौतूक केलं अन् मुख्यमंत्री असतानाचा किस्सा सांगितला. मी प्रचार सभा घेणार नव्हतो, पण नारायणरावांचा फोन आल्यावर मी नाही म्हणू शकलो नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

नारायण राणे यांना 6 महिने मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यांनी ज्याप्रकारे काम केलं, ते भल्या भल्यांना जमलं नाही. अंतूले यांच्यानंतर राणे यांनी खरं वाघाप्रमाणे काम केलं. अंतुलेंनंतर राणे हाच काम करणारा वाघ, असं म्हणत राज ठाकरे यांनी नारायण राणे यांचं कौतूक केलं. त्यावेळी बोलताना राज ठाकरेंनी फिरकी घेतली. मी कौतूक करायचंच म्हणून बोलत नाहीये, पण मला खरंच प्रश्न पडला होता की नारायण राणे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतील की नाही?.. पण त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले आणि अनेकांना जमलं नाही असं काम त्यांनी केलं, असं म्हणत राज ठाकरे यांनी फिरकी घेतली. 5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर प्रचाराला येण्याची गरज पडली नसती, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

अनिल शिरोदे हे सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांना घेऊन नारायण राणे यांच्याकडे  घेऊन गेले. त्यावेळी नारायणराव विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी सभागृह सुरू होतं. बालमृत्यू आणि कुपोषण या विषयांवर नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. नारायणरावांनी त्यावएळी सर्व ऐकून घेतलं अन् दुसऱ्या दिवशी सभागृहात खणखणीत भाषण केलं. त्यावेळी अभय बंग यांना देखील आश्चर्य वाटलं. एखाद्या विषयावर काम करणं त्य़ांना चांगलं माहिती आहे, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, सभेपूर्वी राज ठाकरे आणि नारायण राणे यांची निलम कंट्री या हॉटेलवर भेट झाली. राज ठाकरे बांदा येथे दाखल होताच भाजप व मन सैनिकांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंवर जेसीबीतून फुलांची उधळणही करण्यात आली होती. 

2024-05-04T16:42:52Z dg43tfdfdgfd