SASSOON HOSPITAL : ससूनमध्ये चार कोटींचा अपहार ; अकाउंटंटसह 25 जणांवर गुन्हा दाखल

ड्रग प्रकरणात मोठ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्यावरून तसेच पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यावरून चव्हाट्यावर आल्यानंतर आता ससून रुग्णालयातील मोठा आर्थिक गैरव्यवहार बाहेर आला आहे. ससून रुग्णालयाचे शासकीय बँक खात्यातील रक्कम आपले स्वतःचे व इतर 23 शासकीय व खासगी व्यक्तींच्या बँक खात्यावर अनधिकाराने जमा करून तब्बल चार कोटी 18 लाख 62 हजारांचा अपहार केला. याप्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात ससून रुग्णालयातील अकाउंटंट अनिल माने, रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह आणखी 23 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ससून रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी गोरोबा विठोबा आवटे (वय 55, रा. पिंपळे गुरव) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आवटे हे ससून रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना दि. 12 सप्टेंबर 2024 रोजी पत्रान्वये रुग्णालयाच्या शासकीय नोंदीमध्ये तफावत असल्याबाबत कळवले. तसेच, आपल्या पातळीवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे कळविले. त्यानुसार कार्यालयीन आदेशानुसार 13 सप्टेंबर 2024 रोजी चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने केलेल्या चौकशीत शासकीय नोंदवहीमध्ये तफावत असल्याबाबत प्राथमिक चौकशी व संचालनालय स्तरावरून चौकशी समितीच्या अहवालावरून यामध्ये पूर्णपणे आर्थिक अपहार झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला. ससून रुग्णालयातील 16 शासकीय नोकर आणि आठ खातेदारांच्या खात्यात एकूण एक कोटी 18 लाख 62 हजार वर्ग करण्यात आल्याचे या चौकशी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले.

... यांच्या खात्यावर पैसे झाले वर्ग

नीलेश हिरामणी शिंदे, सचिन ससार, पूजा गराडे, सुलक्षणा चाबुकस्वार, सुनंदा भोसले, सुमन वालकोळी, अर्चना अलोटकर, मंजुषा जगताप, दीपक वालकोळी, सरिता शिर्के, संदेश पोटफोडे, अभिषेक भोसले, संतोष जोगदंड, दयाराम कछोटिया, श्रीकांत श्रेष्ठ, भारती काळे, उत्तम जाधव, संदीप खरात, अनिता शिंदे, सरिता अहिरे, शेखर कोलार, नंदिनी चांदेकर, सरिता लहारे, राखी शहा यांच्या बँक खात्यामध्ये एकूण चार कोटी 18 लाख 62 हजार रुपये जमा झाले आहेत. यामध्ये अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यावर बँकेचे व्यवहार सोपविले आहेत. त्यांनी बेकायदेशिरपणे बँक खात्यातील सरकारी रक्कम आपल्या स्वतःच्या व इतर शासकीय व खासगी व्यक्तींच्या बँक खात्यात अनधिकाराने वळविल्याचे म्हणत शासनाची फसवणूक केली.

चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन आदेश जारी

बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले, आम्ही जुलै 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजमधील 11 आणि बारामती मेडिकल कॉलेजमधील चार जणांना निलंबित केले आहे. या गैरव्यवहारात सामील असलेला एक सेवानिवृत्त व्यक्ती त्या काळात रुग्णालयाच्या प्रशासकीय कामात सक्रिय होता. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये एक कार्यालयीन अधीक्षक, सात लिपिक कर्मचारी, एक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, एक वॉर्ड बॉय आणि पाच परिचारिकांचा समावेश असल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन आदेश जारी करण्यात आले आहेत.

2024-09-16T05:45:31Z dg43tfdfdgfd