TERROR ATTACK: एअर फोर्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, पाच जवान जखमी

Terrorist attack on Indian Air Force vehicle convoy in Poonch: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी वायू दलाच्या ताफ्यावर हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. वायू दलाच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात एकूण पाच जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी वायू दलाच्या ताफ्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. जम्मू काश्मीरमधील पूंछ भागात असलेल्या सूरनकोट परिसरात ही घटना झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सैन्य दलाच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या. संपूर्ण परिसराला घेरण्यात आले असून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

पुंछमध्ये संदिग्ध दिसले

पुंछमध्ये गेल्या आठवड्यापासून भारतीय सैन्य दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या ठिकाणी दोन संशयित दहशतवादी सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसले होते. यानंतर सैन्य दलाने आपली शोध मोहीम आणखी तीव्र केली. यापूर्वी उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक ग्रामरक्षक जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर पुंछमध्ये सकाळपासूनच शोध मोहीम सुरू केली. त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी संशयित व्यक्तींना पाहिल्याचं म्हटलं होतं. गेल्यावर्षी पुंछमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांवर अनेक वेळा दहशतवादी हल्ले झाले. अशा प्रकारती ही वर्षातील पहिलीच घटना आहे.

बांदीपोरा येथे दहशतवाद्यांचे ठिकाण उद्वस्त

शुक्रवारी (3 मे 2024) उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी लपून बसले होते. दहशतवाद्यांचे हे ठिकाण सैन्य दलाने उद्वस्त केले आहे. घटनास्थळी दोन एके 47 रायफल, दारूगोळा आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आला आहे. बांदीपोरा पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलाने पोलिसांसह केलेल्या संयुक्त कारवाईनंतर मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे.

2024-05-04T15:03:47Z dg43tfdfdgfd