'अडीच कोटी द्या EVM हॅक करुन देतो' भारतीय जवानाची थेट दानवेंना ऑफर! घटनेने खळबळ

छत्रपती संभाजीनगर, (अविनाश कानडजे, प्रतिनिधी) : राज्यात आज 11 लोकसभा जागांवर मतदान होत आहे. या निवणुकीत ईव्हीएमच्या वापरावर विरोधकांकडून वारंवार संशय व्यक्त केला जात आहे. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं असं दावा विरोधकांनी अनेकदा केला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करुन दाखवा असं आव्हान सर्व पक्षांना केलं होतं. त्यावेळी सर्वांनी माघार घेतली. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अडीच कोटी रुपये द्या ईव्हीएम हॅक करून तुमच्या उमेदवाराला जिंकून देतो असं सांगणाऱ्या एका व्यक्तीला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

महत्त्वाचं म्हणजे हा व्यक्ती भारतीय सैन्यात हवालदार म्हणून काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मारुती नाथा ढाकणे असे या माणसाचं नाव आहे. नगर जिल्ह्यातील काटेवाडी या गावचा हा रहिवासी आहे. या आरोपीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोन करून अशा पद्धतीची ऑफर दिली. गेले सहा महिने हा व्यक्ती अंबादास दानवे यांना फोन करत होता. मात्र, अखेर अंबादास दानवे यांना या सगळ्या प्रकरणाचा संशय आला. त्यांनी संभाजीनगर पोलीस आयुक्तांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी ट्रॅप करून या माणसाला आज संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये अटक केली आहे. याबाबत आता पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

म्हणून भारतीय सैन्यातील जवानाने दिली ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर

हा व्यक्ती भामटा चोर आहे. भारतीय सैन्यात तो जवान आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या तो ड्युटीला आहे. त्याच्यावर मोठे कर्ज झाले असल्याने भामटेगिरी करून बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ईव्हीएम हॅक करतो असे त्याने सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्याला कुठलेही नॉलेज नाही. त्याच्यावर कर्ज झालेले होते ते पैसे कुठून तरी मिळावे त्यासाठी त्याने हे सर्व केलं असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.

वाचा - 'बारामतीत पैशांचा पाऊस' रोहित पवारांकडून आणखी एक VIDEO, म्हणाले भ्रष्टाचाराचं धरण..

संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यात महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, 'एमआयएम'चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान व अपक्ष हर्षवर्धन जाधव या प्रमुख पाच उमेदवारांचा समावेश आहे. मुख्य लढत भुमरे-खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्येच होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

2024-05-07T12:47:35Z dg43tfdfdgfd